Shiv Sena Political Crisis: मोठी अपडेट! ठाकरेंच्या 6 खासदारांच्या बंडानंतर ओम बिर्लांनी ‘मातोश्री’च्या शिष्टमंडळाला दिल्लीत बोलावले

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान, मूळ शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोर खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये, अशी अधिकृत आणि कायदेशीर विनंती ठाकरे गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Political Crisis: मोठी अपडेट! ठाकरेंच्या 6 खासदारांच्या बंडानंतर ओम बिर्लांनी ‘मातोश्री’च्या शिष्टमंडळाला दिल्लीत बोलावले

Shiv Sena Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'मुळे (Operation Tiger) प्रचंड मोठी खळबळ उडाली असतानाच आता देशाची राजधानी दिल्लीतून एक अतिशय महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांची बाजू मांडण्यासाठी तातडीने बोलावले आहे. "तुमची नेमकी काय बाजू आहे, ती मांडण्यासाठी आजच माझ्यासमोर या," असा स्पष्ट निरोप लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून ठाकरे गटाला देण्यात आला आहे. त्यानुसार आज, 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ठाकरे गटाचे प्रमुख नेते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई घेणार भेट
या तातडीच्या बोलावण्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai) हे दोघे सायंकाळी 5 वाजता लोकसभा अध्यक्षांच्या दालनात उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान, मूळ शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोर खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये, अशी अधिकृत आणि कायदेशीर विनंती ठाकरे गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे. पक्षातील या मोठ्या फुटीनंतर पक्षाचे अधिकृत अस्तित्त्व आणि संसदेतील स्थान टिकवण्यासाठी ठाकरे गटाची ही धावपळ अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

'ऑपरेशन टायगर'चा संपूर्ण टाईमलाईन
एकनाथ शिंदे यांच्या या विशेष मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाचे खासदार कधी आणि कसे फुटले, याचा धक्कादायक घटनाक्रम आता समोर आला आहे:
– 16 जून (संध्याकाळी 6): बंडखोर खासदारांचा गट गुप्तपणे दिल्लीत दाखल झाला.
– 17 जून (सकाळी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत या सर्व खासदारांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर सखोल चर्चा केली.
– 17 जून (सकाळी 7) : या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी द्यावी, असे अधिकृत पत्र सोपवले.
– बंडानंतरची गुप्तता: या पत्रावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करत 6 पैकी 4 खासदारांना तात्काळ जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये हलवण्यात आले, तर उर्वरित 2 खासदार इतर ठिकाणी रवाना झाले.
– सोमवार: या सर्व बंडखोर खासदारांनी मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे 'शिवसेनेत' प्रवेश केला.
– आता उद्धव ठाकरेंसोबत अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), अनिल देसाई (दक्षिण मध्य), राजाभाऊ वाजे (नाशिक) हे 3 खासदार निष्ठावंत राहिले आहेत.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Session 2026: 'मोठ्या उद्योगपतींसाठी तरुण सुशिक्षितांना मारू नका…'; भाई जगताप यांचा सरकारला इशारा

बंडखोर खासदारांची संपूर्ण यादी
शिंदे गटात सामील झाल्याचा दावा असलेले 6 बंडखोर खासदार:
संजय जाधव (परभणी)
संजय देशमुख (यवतमाळ – वाशिम)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

पक्षातील या उभ्या फुटीमुळे शिवसेनेची संसदेतील ताकद आता कमालीची घटली असून, केवळ 3 खासदार उद्धव ठाकरेंसोबत उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षांसोबतच्या बैठकीत काय निर्णय होतो, यावर महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची पुढील दिशा ठरणार आहे.

हेही वाचा – ED Raids: बेनामी जमिनी अन् बार-रेस्टॉरंटमधून काळा पैसा? मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणाऱ्या बड्या मंत्र्यांचे जावई ED च्या जाळ्यात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version