मुंबई : मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महापौरपदावरून महायुतीमध्ये सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपद अडीच वर्षांनंतर शिंदे गटाकडे जाण्याची चर्चा असून या सत्ताबदलमध्ये महापौरपद मिळवण्यासाठी शिंदसेनेला आपली पालिकेतील ताकद वाढवावी लागणार आहे. आता यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शिंदेसेनेला आपलं संख्याबळ वाढवावं लागणार असून या दृष्टीने शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ अमलात आणण्याची रणनीती आखल्याचे समजते.
या मोहिमेची जबाबदारी चार प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये निलेश राणे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. या नेत्यांना फोन करून मिशनबाबत सूचना देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपकडे 88, ठाकरे गटाकडे 64, तर शिंदे गटाकडे 29 नगरसेवक असल्याची माहिती आहे. त्यामुळे संख्याबळाचं गणित बदलण्यासाठी ठाकरे गटातील नगरसेवकांना गळाला लावण्यावर शिंदे गटाचा भर आहे.