Sharmila Thackeray : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शर्मिला ठाकरे संतापल्या; चिपी विमानतळ बंद असल्यावरून सरकारला केला सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय फोडाफोडीवर अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे.
Sharmila Thackeray : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शर्मिला ठाकरे संतापल्या; चिपी विमानतळ बंद असल्यावरून सरकारला केला सवाल

Sharmila Thackeray Criticizes BJP on Different Issues : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय फोडाफोडीवर अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. देशातील विरोधी पक्षांचे नेते आणि पक्ष चोरण्यापेक्षा भाजपने स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठे करावे, असा थेट सल्ला त्यांनी दिला आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष फोडण्यात आल्याचा दाखला देत त्यांनी संताप व्यक्त केला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदेत अनेक चांगली मुले आहेत, मग त्यांनी आयुष्यभर फक्त दुसऱ्यांच्याच सतरंज्या उचलायच्या का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेचा गैरवापर करून इतर पक्षांतील नेते फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःच्या पक्षाची ताकद स्वतःच्या बळावर वाढवावी, असेही त्या म्हणाल्या.

महागाई आणि 40 ते 50 हजार कोटींच्या चिपी विमानतळाच्या दुरवस्थेवर प्रश्नचिन्ह
शर्मिला ठाकरे यांनी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या सरकारी कारभाराचा जोरदार पर्दाफाश केला. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सध्या बंद अवस्थेत असून, एवढा मोठा निधी खर्च करूनही जर ते कार्यन्वित नसेल, तर त्यामागे नक्की कोणाचा स्वार्थ आहे, असा सवाल त्यांनी केला. एका विमानतळाच्या बांधकामासाठी साधारण 40 ते 50 हजार कोटी रुपये खर्च येतो. चिपी येथील विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही, केवळ गोव्याच्या विमानतळाला फायदा पोहोचवण्यासाठी हे विमानतळ बंद करण्यात आले, असा गंभीर आरोप एका सराफा व्यापाऱ्याचे उदाहरण देत त्यांनी केला. 12 वर्षांपूर्वी ज्या महागाईच्या मुद्द्यांवरून भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती, त्या पेट्रोलने आज 100 रुपयांचा टप्पा ओलांडला असूनही सरकार आता चकार शब्द बोलायला तयार नाही, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Gajanan Kale: ‘उत्सव साजरा करायचा की दुःख व्यक्त करायचं…’; गणवेश-पुस्तकांवरून गजानन काळे यांचा सरकारवर थेट हल्लाबोल

पुरंदरचा विमानतळ प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न
हवाई दळणवळणाच्या नावाखाली चाललेल्या या मनमानी कारभारावर बोलताना त्यांनी पुरंदर विमानतळाचा मुद्दाही लावून धरला. पुरंदरमधील सुपीक शेतीची जमीन शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सरकार जबरदस्तीने विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिथल्या शेतकऱ्यांना सक्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्यांनी याविरोधात हरित लवादाकडे दाद मागितली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयापासून ते हरित लवादापर्यंत सर्वच यंत्रणांवर सरकारचे नियंत्रण असल्याने सामान्य जनतेला कुठेही न्याय मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईत विमानतळ झाले असताना आणि पुण्यात आधीच विमानतळ उपलब्ध असताना, पुरंदरमध्ये आणखी एका प्रकल्पाचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, मोदी सरकार आल्यापासून किती विमानतळ नवे बांधण्यात आले आणि त्यातील किती चालू आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला. सरकार सर्वसामान्य जनतेकडून आलेल्या करातून या विमानतळांसाठी आणि प्रकल्पांसाठी पैसा खर्च करते. मग असे प्रकल्प अनावश्यक उभारले जाणे किंवा ते बंद पडणे हे जनतेचेच नुकसान आहे. यामागे कोणाचे स्वार्थ आहेत? कोण स्वतःच्या तुंबड्या भरून घेत आहे? यावर प्रश्न का विचारले जात नाहीत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पर्यावरणाचा ऱ्हास आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची दुरवस्था
आपल्या भाषणाच्या शेवटी शर्मिला ठाकरे यांनी सरकारच्या विकास धोरणांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांकडे सर्वांचे लक्ष वेधले. विविध प्रकल्पांसाठी सरकार 100 ते 200 वर्षे जुनी झाडे बेसुमारपणे तोडत आहे, ज्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढली आहे. या वृक्षतोडीमुळे पाऊस उशिरा पडणार असून जमिनीतील पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. जनसामान्यांच्या करातून जमा झालेला पैसा प्रशासकीय अपयशामुळे अशा धूळ खात पडलेल्या प्रकल्पांमध्ये अडकून पडला आहे. सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची आणि देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागली आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Sandeep Deshpande: ‘मासे खाऊ नका हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच…’; जैन मुनींच्या इशाऱ्यावर संदीप देशपांडेंचा संताप 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version