बारामती : मराठा समाजाचा अंतर्भाव मंडल आयोगावेळी न करणे हे शरद पवार यांचे पाप आहे, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या टीकेला आज शरद पवारांनी उत्तर दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज बारामती येथे पत्रकर परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विखेबाबतच्या प्रश्नावर हसत हसत उत्तर दिले. तसेच त्यांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण आदी प्रश्नांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1994 साली मंडल आयोगात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणे करण्याची वेळ आली नसती. हे शरद पवार यांचे पाप आहे, अशी राधाकृष्ण टीका विखे पाटील यांनी केली. त्यावर शरद पवार प्रत्युत्तर देताना म्हणाले की, 1994 पासून आतापर्यंत विखे पाटील काय करतायेत, ते कुठे होते, अशी विचारणा करीत या टीकेला अर्थ नसल्याचेच शरद पवार अप्रत्यक्षपणे म्हणाले.
तसेच पंतप्रधानांच्या बारामती दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी बारामतीला येतो म्हणाले आहेत. आम्ही त्यांना 16 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. पण ती पुढे मागे होण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इन्स्टिट्यूट इथे उभी केली आहे. ती देशातील पहिलीच संस्था आहे. त्याची ते पाहणी करतील, त्याचे एक प्रेझेंटेशन त्यांना द्यायचे आहे. आमच्या काही लोकांनी सुप्रियाच्या मुलीच्या लग्नात त्याचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं होते. पण त्यांना हे सविस्तर समजून घ्यायचे आहे, तो कार्यक्रम येथे आहे, असे पवारांनी सांगितले.