Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब या संकटाच्या काळात एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अजित पवार यांचे त्यांच्या मातोश्री आशाताई यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. मुलाच्या निधनाची बातमी समजल्यापासून आशाताई प्रचंड धक्क्यात आहेत. अशा कठीण प्रसंगी अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी कुटुंबाचा आधारवड म्हणून आशाताईंची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.
हेही वाचा – Sunetra Pawar Breaking: सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री; शपथविधीसाठी वेळही ठरली
सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर
‘दादा’च्या निधनामुळे सुप्रिया सुळे स्वत:ला सावरत आहेत. आशाताईंची भेट घेताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांनी आशाताईंना धीर देत त्यांचे सांत्वन केले. राजकीय फाटाफुटीनंतरही कुटुंबातील ओलावा कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले. ‘राजकारण आपल्या जागी असले तरी कौटुंबिक नाते सर्वात वर असते,’ हेच या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
बारामतीकरांच्याही डोळ्यांत पाणी
शरद पवार यांनी आशाताईंशी बराच वेळ संवाद साधला आणि या कठीण काळात धीर दिला. यावेळी कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. अजितदादांच्या जाण्याने बारामतीची आणि पवार कुटुंबाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केवळ सांत्वनच केले नाही, तर कुटुंबाचा आधार म्हणून या संकटात आम्ही सर्व सोबत आहोत, असा विश्वासही दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.