Pravin Kolape : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये सांगलीच्या एका सुपुत्राने आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील प्रवीण कोळपे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशात 584 वा क्रमांक पटकावला आहे. मजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज करत प्रवीण यांनी मिळवलेल्या या यशाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
वडिलांचे छत्र हरपले पण जिद्द सोडली नाही
प्रवीण यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांच्या आईने हार मानली नाही. मुलाने अधिकारी व्हावे या जिद्दीने त्यांनी शेतात मोलमजुरी करून प्रवीणच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. प्रवीण यांनीही आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत सलग प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर आपल्या 6 व्या प्रयत्नात हे ऐतिहासिक यश मिळवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
आजीची इच्छा: "नातवाच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचंय"
प्रवीण यांचे नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत झळकल्यानंतर मिटकी गावात दिवाळी साजरी करण्यात आली. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी प्रवीण यांचा जंगी सत्कार केला. यावेळी त्यांच्या आजीने व्यक्त केलेली भावना सर्वांचे मन जिंकून गेली. "माझा नातू आता मोठा साहेब झाला आहे, मला आता त्याच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. संपूर्ण कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भावूक आणि अभिमानाचा ठरला आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरले प्रेरणास्थान
यावर्षीच्या UPSC परीक्षेत एकूण 958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत टिकून राहणे आणि यश मिळवणे हे कोणत्याही ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आव्हानात्मक असते. प्रवीण कोळपे यांनी दाखवून दिले की, सातत्य आणि कठोर परिश्रम असेल तर गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. त्यांचे हे यश खेड्यापाड्यातील अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, जे अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.