Rohit Pawar Hunger Strike : रोहित पवारांच्या आंदोलनाचा 3 रा दिवस; प्रकृती खालावली, तरीही अन्न-त्यागावर ठाम; उपोषणस्थळी कुटुंबीय भावुक

रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारवरील दबाव आता वाढू लागला आहे. प्रकृती खालावत असतानाही त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणारी ठरत आहे.
Rohit Pawar Hunger Strike : रोहित पवारांच्या आंदोलनाचा 3 रा दिवस; प्रकृती खालावली, तरीही अन्न-त्यागावर ठाम; उपोषणस्थळी कुटुंबीय भावुक

Rohit Pawar Hunger Strike : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा आज 3 रा दिवस असून, अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत मोठी घसरण झाली आहे. आंदोलनस्थळी रोहित पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. वडिलांना या अवस्थेत पाहून त्यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले. मुलाच्या डोळ्यांतील पाणी पाहून स्वतः रोहित पवारही काही क्षणासाठी कमालीचे भावुक झाले. त्यांनी तात्काळ आपल्या मुलाचा हात हातात घेतला, त्याला जवळ ओढले आणि त्याची समजूत काढली.

उपोषणस्थळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र; कार्यकर्तेही झाले भावुक
या कठीण प्रसंगात रोहित पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपोषणस्थळी उपस्थित होते. यामध्ये त्यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि वडील राजेंद्र पवार यांचा समावेश होता. संपूर्ण पवार कुटुंब उपोषणस्थळी एकत्र आल्याने आणि चिमुरड्या मुलांचे अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या डोळ्यातही पाणी आले. आंदोलनस्थळावरील हे दृश्य पाहून संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.

डॉक्टरांचा सल्ला धुडकावला; साखरेचे प्रमाण घटले
गेल्या 3 दिवसांपासून अन्न पाण्याचे सेवन न केल्याने रोहित पवार यांच्या रक्तातील साखरेचे (Blood Sugar) प्रमाण लक्षणीय घटले आहे. आंदोलनस्थळी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ 'ओआरएस' (ORS) किंवा ग्लुकोजचे पाणी घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला. मात्र, रोहित पवार यांनी डॉक्टरांचा हा सल्ला स्पष्टपणे धुडकावून लावला आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही आणि आंदोलनातून मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Gopichand Padalkar : '…मेरी एन्ट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी!' म्हणत गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना नाव न घेता टोला

रोहित पवार यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
शेतकऱ्यांच्या हितासाठी रोहित पवार यांनी सरकारसमोर या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत –
सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी उपोषण
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा
नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया सुरळीत करा
कांद्याला कि‌मान 2500 प्रति क्विंटल दर द्या
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्या
मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारवरील दबाव आता वाढू लागला आहे. प्रकृती खालावत असतानाही त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणारी ठरत आहे. प्रशासनाने आणि सरकारी प्रतिनिधींनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी आता आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या जनतेकडून केली जात आहे. मात्र, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, यावर रोहित पवार आणि त्यांचे समर्थक पूर्णपणे ठाम आहेत.

हेही वाचा – Uddhav Thackeray MP Meeting Matoshree : मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version