अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.
अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घोषणेपासून तालिबाननं अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली.