Dr. Umar Nabi Video Update : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या डॉ. उमर नबीचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला होता. या व्हिडिओमध्ये तो आत्मघाती बॉम्बस्फोटाचे वर्णन 'शहीद मोहीम' असे करताना दिसत आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर नबीने हा व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या मोबाइल फोनवरून रेकॉर्ड केला होता.
तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाच्या रात्री जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा येथील निवासस्थानातून उमरच्या धाकट्या भावाला ताब्यात घेतले होते. याच धाकट्या भावाकडे उमरने बॉम्बस्फोटापूर्वी आपला मोबाइल फोन दिला होता. एका वृत्तसंसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, चौकशीदरम्यान धाकट्या भावाने कबूल केले की, डॉ. उमरच्या सांगण्यावरून त्याने तो फोन एका गटारात फेकून दिला होता. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने त्या गटाराजवळ जाऊन तो फोन शोधण्यासाठी मोहीम राबवली. खूप प्रयत्नांनंतर तो फोन मिळवण्यात यश आले असून तो जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटात पाकिस्तानाचाच हात, आत्मघातासाठी पाक हँडलरकडून उमरचं ब्रेनवॉश
याशिवाय, तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उमरच्या सहकाऱ्यांनी चौकशीदरम्यान उघड केले आहे की, तो या सर्व जैश मॉड्यूलमध्ये सर्वात कट्टरपंथी होता आणि तो अनेकदा आत्मघाती बॉम्बस्फोटांविषयी बोलायचा.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जप्त केलेला हा मोबाइल फोन डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवला होता. यातून किमान चार व्हिडिओ रिकव्हर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. सूत्रांनी पुढे स्पष्ट केले की, हे व्हिडिओ एनआयए (NIA) आणि राज्य तपास संस्थेला पुढील तपासासाठी देण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या दोन मोबाइल फोनमधील कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) च्या मदतीने उमरशी जवळचे संबंध असलेले आणि या कटात सहभागी असलेल्या संशयितांची यादी तयार केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अल फलाह विद्यापीठातील डॉक्टर्स आणि जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांसह 60 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.