राजस्थान : राजस्थानमधील 309 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10,167 वॉर्डांसाठी दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज, 14 सप्टेंबर रोजी सुरू झाली. या निकालांवर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 38,889 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका 9 आणि 11 सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडल्या होत्या. राजस्थानमध्ये सहा महानगरपालिका, 24 नगरपरिषदा आणि 117 नगरपालिकांसाठी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदानाची टक्केवारी 70.01 इतकी नोंदवली गेली. यात एकूण 87.63 लाख मतदारांपैकी 61.35 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी 162 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 76.41 इतकी होती. महापौर आणि अध्यक्षांची निवड 21 सप्टेंबर रोजी केली जाईल. तर उपमहापौर, उपाध्यक्ष आणि नगरपालिका उप-अध्यक्षांची नियुक्ती 22 सप्टेंबर रोजी केली जाईल.
#WATCH | Jaipur, Rajasthan: "…I won by 127 votes by defeating Ajay Singh Chauhan, former chairman and district vice president who is from the BJP… This was an election for our brotherhood and for the people. Upon becoming a councillor, I will do a better job…," says… pic.twitter.com/1ZNC1XgP6W — ANI (@ANI) September 14, 2026
जयपूर महानगरपालिका आणि जयपूर जिल्ह्यातील इतर 18 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची मतमोजणी आज ‘श्री भवानी निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी’ येथे होत आहे. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एकूण 15 मोजणी कक्ष आणि 150 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.