मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे केवळ रेल्वे स्थानक नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करून देणारं ऐतिहासिक स्थळ आहे. याच पार्श्वभूमीवर CSMTवरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या घोषणांमध्ये शिवरायांचा जयघोष समाविष्ट करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे यासंदर्भातील पत्र सुपूर्द करत आपल्या मागणीची माहिती दिली.
नेमकी काय आहे मागणी?
CSMTवरून सुटणाऱ्या तसेच या स्थानकात दाखल होणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या नियमित उद्घोषणांमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे. सध्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध माहिती देण्यासाठी नियमित घोषणा केल्या जातात. त्याच घोषणांच्या धर्तीवर शिवरायांच्या जयघोषाचाही अधिकृतपणे समावेश करण्याची भूमिका नार्वेकर यांनी मांडली आहे.
देशभर पोहोचेल शिवरायांचा विचार
CSMT हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे येथे होणाऱ्या घोषणांचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही, तर देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांपर्यंत हा संदेश पोहोचू शकतो, असा नार्वेकरांचा युक्तिवाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य, त्यांचे प्रशासन, पराक्रम आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. शिवरायांच्या कार्याची नव्या पिढीला अधिक व्यापक ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेणार?
राहुल नार्वेकर यांनी अश्विनी वैष्णव यांना या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाला आवश्यक त्या सूचना तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मागणीला मंजुरी मिळाल्यास CSMTवरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या उद्घोषणांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष ऐकायला मिळू शकतो.