Rahul Gandhi leadership : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात आली असून, या निकालाने येत्या काळात देशाच्या राजकारणात मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात. जरी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या असल्या, तरी ममता बॅनर्जी यांचा पराभव राहुल गांधी यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर मानला जात आहे.
केरळमध्ये काँग्रेस आघाडीने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे राहुल गांधी यांचे 'इंडिया' आघाडीतील पारडे आता अधिक जड झाले आहे. याच पद्धतीने स्टॅलिन यांचा तामिळनाडूतील पराभवाचाही राहुल गांधींना पुढील काळात स्वतःचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी फायदा होऊ शकतो. याशिवाय, टीव्हीकेसह सत्तेत आल्याचाही वेगळा लाभ होऊ शकतो. यामुळे ममता आणि स्टॅलिन यांच्या धक्कादायक पराभवांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला अनुकूल वातावरण निर्माण केले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आघाडीत राहुल गांधींचे नेतृत्व आता निर्विवाद?
इंडिया आघाडीत आतापर्यंत ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन हे राहुल गांधींच्या नेतृत्वाला मोठे आव्हान देत होते. ममता बॅनर्जी या चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्या असत्या, तर इंडिया आघाडीवर त्यांचा वरचष्मा राहिला असता. मात्र, या निवडणुकीत दोन्ही बड्या नेत्यांना आपली सत्ता राखता आली नाही, ज्यामुळे आघाडीत काँग्रेसची 'बार्गेनिंग पॉवर' वाढली आहे. अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांचा ओढाही दीदींच्या बाजूने होता, पण आता भाजपशी दोन हात करण्यासाठी सर्वांना राहुल गांधींचेच नेतृत्व मान्य करावे लागणार आहे.
बंगाल निवडणुकीची आकडेवारी आणि भाजपची झेप
पश्चिम बंगालमध्ये सत्तेचे गणित पूर्णपणे बदलले असून भाजपने 185 जागांवर आघाडी घेत मोठा विजय संपादन केला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस केवळ 93 जागांपर्यंत मर्यादित राहिली आहे. 49 वर्षांपासून बंगालमध्ये राजकीय वनवास भोगणाऱ्या काँग्रेसला आता तृणमूलच्या पडझडीत मोठी संधी दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला राज्यात अनेक ठिकाणी जागा देण्यास विरोध केला होता, मात्र आता त्यांच्या पराभवामुळे काँग्रेसला राज्यात नव्याने संघटन बांधून 5 वर्षांनंतर प्रमुख विरोधी पक्ष बनण्याची आशा निर्माण झाली आहे.
केरळमधील विजय आणि राहुल गांधींचा करिश्मा
राहुल गांधी यांनी केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवून लावत आघाडीच्या जोरावर सत्ता खेचून आणली आहे. लोकसभा 2024 मध्ये काँग्रेसला ज्या 40 जागांची उणीव भासली होती, ती कसर आता विधानसभा निकालांनी भरून काढली आहे. राहुल गांधींच्या राजकीय दूरदृष्टीवर होणाऱ्या टीकेला केरळच्या विजयाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ममतांच्या आक्रमक स्वभावापेक्षा राहुल गांधींचा स्वभाव आता मित्रपक्षांना अधिक स्वीकारार्ह वाटू लागला आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एका महत्त्वाच्या राज्यात पुनरागमन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.