मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गवर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधील कॅन्टीन, वसतिगृह आणि इतर सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे आज पुण्याला गेले आहेत. तसेच पुण्यातील गणेशखिंड परिसरातील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील कार्यक्रमला उपस्थिती दाखवत पुण्यातील सात कॉलेजच्या व्यवस्था आणि सुविधांची पाहणी करणार आहेत. दरम्यान पुण्यातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो पाहिल्याबरोबर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला. तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेस आणि वस्तीगृहाची पाहणी करून कार्यालयात जाब विचारताना मोदींचा फोटो समोर दिसल्याने संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो कार्यालयात लावल्याने ‘काढ रे तो फोटो….’, असे आदेश देत अमित ठाकरे यांनी तो फोटो काढायला लावला आहे.
यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, “मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. मला तिथे जाणीव करून देण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे. मोदींना एवढ्या मोठ्या स्तरावर नेऊन ठेवू नका, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी मोदींची तुलना कधीच होऊ शकत नाही.”
“हे शासकीय कॉलेज आहे, त्यामुळे मोदींचा फोटो लावायचा असेल तर कॉलेजमध्ये दुसरीकडे कुठेही लावा. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला मोदींचा फोटो नाही लावला पाहिजे. कॉलेजचा प्रोटोकॉल असेल तर फोटो नक्की लावा, पण महाराजांच्या शेजारी नाही.”
“महाराजांपेक्षा देशाचे पंतप्रधान मोठे झालेत का? महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लागलेला पाहून तुम्हाला वाईट वाटत नाही का? तुम्ही या गोष्टीचे समर्थन करता का? उद्या तुम्ही देवघरात सुद्धा मोदींचा फोटो लावाल का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. होय, मी स्वतः तो फोटो काढायला सांगितला आणि जिथे जिथे महाराजांच्या बाजूला असे फोटो लावले असतील ते सर्व काढलेच पाहिजेत.”