Pune MLC Election 2026 : महायुतीत तिढा वाढला; ‘राष्ट्रवादी’त रंगला शहरी विरुद्ध ग्रामीण संघर्ष

या प्रतिष्ठेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 प्रमुख माजी आमदारांनी शड्डू ठोकला आहे. चारही नेत्यांनी तिकिटासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्षातील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.
Pune MLC Election 2026 : महायुतीत तिढा वाढला; ‘राष्ट्रवादी’त रंगला शहरी विरुद्ध ग्रामीण संघर्ष

Pune MLC Election 2026 : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने आपला दावा ठोकल्यामुळे आधीच महायुतीत तणाव निर्माण झाला असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातही अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षातील 4 माजी आमदारांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी ‘शहरी विरुद्ध ग्रामीण’ असा तीव्र प्रादेशिक संघर्ष सुरू झाला असून, यामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

उमेदवारीवरून जुने मोहरे आमनेसामने
या प्रतिष्ठेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून 4 प्रमुख माजी आमदारांनी शड्डू ठोकला आहे. यामध्ये पुणे शहरातील माजी आमदार सुनिल टिंगरे आणि पिंपरी-चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे हे शहरी भागातून शर्यतीत आहेत. तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते यांनी आपली दावेदारी भक्कमपणे मांडली आहे. या चारही नेत्यांनी तिकिटासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्षातील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.

‘शहरी की ग्रामीण’वरून वाद पेटला
ग्रामीण भागातील नेत्यांचा असा युक्तिवाद आहे की, या मतदारसंघातून आजवर केवळ शहरी भागालाच प्रतिनिधित्व मिळाले आहे, त्यामुळे यंदा ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला न्याय मिळावा. याउलट, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या महापालिका क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी शहरी भागातील नेत्यालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह शहर भागातील दावेदार धरत आहेत. हा प्रादेशिक पेच सोडवण्याचे आणि या वादातून सुवर्णमध्य काढण्याचे मोठे आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी! सावंतवाडी स्थानकाला नवे नाव देण्यास हिरवा कंदील; राज्य मंत्रिमंडळाकडून कोकण, डोंबिवली आणि नागपूरसाठी महत्त्वाचे निर्णय

आकड्यांचे गणित आणि भाजपचा थेट दावा
या मतदारसंघात आतापर्यंत जरी ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व राहिले असले, तरी मागील काही वर्षांत भाजपने आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. पक्षीय बलाबल पाहिल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे 344 सदस्य आहेत, तर भाजपचे 309 आणि शिवसेना (शिंदे) पक्षाकडे 68 सदस्य आहेत. मात्र, दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे 17 सदस्य आणि इंदापूरच्या ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’च्या 7 सदस्यांच्या पाठिंब्याचा हवाला देत आपल्याकडे एकूण 333 जागा असल्याचा दावा भाजपने केला आहे. याच आकड्यांच्या जोरावर भाजपने या जागेवर थेट हक्क सांगितल्याने महायुतीमधील मित्रपक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

भूतकाळातील निवडणुकांवर नजर
या मतदारसंघाच्या भूतकाळातील निवडणुकांवर नजर टाकल्यास पुणे शहराचे पारडे जड राहिल्याचे दिसते. 2010 आणि 2016 अशा सलग दोन टर्म माजी आमदार अनिल भोसले या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात आला, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. त्यापूर्वी, म्हणजेच 2004 मध्ये पिंपरी-चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप निवडून आले होते, परंतु 2009 मध्ये विधानसभेवर निवड झाल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. ग्रामीण भागाला या जागेपासून दूर ठेवले गेल्याची भावना यंदा निवडणुकीत मोठा फॅक्टर ठरणार असे दिसते.

हेही वाचा – Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील पण काही लोकं गैरवापर करताय; पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीचा फडणवीसांना संशय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version