Pipani Symbol: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली. अजित पवार यांच्या गटाला ‘घड्याळ’ तर शरद पवारांच्या गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह मिळाले. मात्र, याच काळात अपक्ष उमेदवारांना मिळालेलं ‘पिपाणी’ हे चिन्ह ‘तुतारी’सारखं दिसल्याने कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सलग दोन निवडणुकांमध्ये फटका बसला. आता अखेर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल केलं आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
उशिरा का होईना, पण योग्य निर्णय – शशिकांत शिंदे
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानतानाच थोडासा खोचक टोला देखील लगावला. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या ‘पिपाणी’ चिन्हामुळे कार्यकर्ते आणि मतदार गोंधळले. त्याची राजकीय किंमत आम्हाला चुकवावी लागली. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र आज वेगळं असतं. तरीही, उशिरा का होईना, योग्य शहाणपण आलं म्हणायला हवं.” शिंदेंनी या निर्णयाला “लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी सकारात्मक पाऊल” असंही म्हटलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं. शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण अस… pic.twitter.com/2o9LQA9zHC — Shashikant Shinde (@shindespeaks) November 13, 2025
‘पिपाणी’मुळे पराभव आणि गोंधळ
दरम्यान, ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या दोन्ही चिन्हांमधील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ झाला होता. सातारा लोकसभेत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढलेल्या शशिकांत शिंदेंना याच गोंधळाचा थेट फटका बसला. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांना चुकीने मतं मिळाली. अशीच स्थिती बीड लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाली.
हेही वाचा – Bihar Elections 2025 : बिहारमधील MY समीकरण नेमकं आहे तरी काय, निकालावर किती होऊ शकतो परिणाम?
आता शरद पवार गटाला दिलासा
आता निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ हे चिन्ह अधिकृतपणे वगळल्यामुळे, आगामी निवडणुकांमध्ये मतदारांमधील गोंधळ कमी होण्याची शक्यता आहे. हा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा दिलासा ठरत असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.