Russia Pakistan Relations: रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अलीकडे सुधारत असल्याचं दिसत होतं. पण आता या नात्यात मोठी तडे गेले आहेत. कारण रशियात पाकिस्तानच्या गुप्तहेर नेटवर्कचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणाने केवळ पाकिस्तानचीच नाही, तर भारताचीही झोप उडवली आहे. कारण या हेरगिरीचं लक्ष्य भारताच्या अत्याधुनिक संरक्षण प्रणाली ‘S-400’ वर होतं.
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात एका रशियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर संरक्षणाशी संबंधित माहिती आणि सैन्य हेलिकॉप्टरची तांत्रिक कागदपत्रं बेकायदेशीरपणे बाहेर पाठवण्याचा आरोप आहे. तपासात हे स्पष्ट झालं की, हा संपूर्ण कट पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा ISI शी जोडलेला होता. ISI या नेटवर्कच्या माध्यमातून रशियाच्या संरक्षण तंत्रज्ञानाची चोरी करत होती, आणि त्याचा थेट फायदा पाकिस्तानला व्हावा, असं त्यांच्या योजनेत होतं.
पण धक्कादायक म्हणजे या हेरगिरीत ‘S-400 एअर डिफेन्स सिस्टिम’शी संबंधित माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हीच ती प्रणाली आहे, जी भारतासाठी एक मोठं सुरक्षाकवच आहे. ‘S-400’ मुळेच भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्यांना अडवण्यात यश मिळवलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान या प्रणालीमुळे पाकिस्तानचं टेहळणी विमान 300 किमी अंतरावरून पाडण्यात आलं होतं. त्यामुळे ही माहिती बाहेर गेली असती, तर भारताच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला असता.
पाकिस्तानच्या या गुप्तहेर कारवायेमुळे रशियात संताप व्यक्त केला जात आहे. रशियाच्या तपास यंत्रणांनी या नेटवर्कमागे ISI चा हात असल्याचं उघड केल्यानंतर पाकिस्तानला सफाई द्यावी लागली. मॉस्कोतील पाकिस्तानी दूतावासाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, “हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध बिघडवण्यासाठी काहीजण मुद्दाम अशी दिशाभूल करत आहेत.”
तथापि, रशियन माध्यमांच्या मते, या घटनेमुळे रशिया आणि पाकिस्तानमधील विश्वासावर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानने रशियातील ‘Mi8AMTSh’ हेलिकॉप्टरची तांत्रिक माहिती मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. हे हेलिकॉप्टर ‘टर्मिनेटर’ नावाच्या अत्याधुनिक आवृत्तीचं मॉडेल आहे, जे रशियाच्या लष्करी क्षमतेचा महत्त्वाचा भाग मानलं जातं.
भारतासाठी या घटनाक्रमाचा वेगळाच अर्थ आहे. कारण ‘S-400’ हे भारताच्या हवाई सुरक्षेचं सर्वात बलवान शस्त्र मानलं जातं. या प्रणालीच्या तांत्रिक तपशीलांची चोरी झाली असती, तर भारताच्या सुरक्षेवर मोठं संकट ओढवलं असतं. सध्या भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या या प्रणालीचं संचालन सीमाभागात सुरू आहे.