Pakistan Fuel Shortage Update : पाकिस्तानातील इंधन संकट आता अत्यंत टोकाला पोहोचले असून, देशातील पेट्रोलचा साठा पूर्णपणे संपत आल्याची धक्कादायक कबुली केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात दिली आहे. 'समा टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की, पाकिस्तानची ऊर्जा सुरक्षा सध्या अत्यंत नाजूक वळणावर आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे, भारताच्या इंधन साठवणूक क्षमतेचा उल्लेख करताना त्यांनी स्वतःच्या देशातील व्यवस्थेबाबत हताश प्रतिक्रिया दिली. "भारताकडे असलेल्या व्यवस्थेमुळे त्यांना पेनाच्या एका सहीवर 60 ते 70 दिवसांचा तेल साठा मिळतो, पण आमची स्थिती तशी नाही," असे म्हणत त्यांनी दोन्ही देशांतील धोरणात्मक फरकावर बोट ठेवले.
केवळ काही दिवसांचा साठा शिल्लक
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडे सध्या कच्च्या तेलाचा साठा अत्यंत मर्यादित असून पेट्रोलची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. देशातील सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून पाकिस्तानकडे सध्या केवळ 5 ते 7 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशाकडे एका दिवसाचाही पेट्रोल साठा शिल्लक नाही. यामुळे जनजीवन सामान्य राखणे अतिशय कठीण झाले आहे. जागतिक बाजारपेठेत दुबई क्रूडचे दर 170 डॉलर्सपर्यंत पोहोचल्याने पाकिस्तानच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
या परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही क्षणी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आधीच दरिद्री असलेल्या पाकिस्तानचे कुत्रा हाल खाणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
इराण-अमेरिका संघर्षाचा मोठा फटका
जागतिक राजकारणातील अस्थिरतेचा, विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. मलिक यांच्या मते, हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नसल्याने जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी स्वतःच्या देशातील ऊर्जा सुरक्षेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. डिझेलचा पुरवठा आणि त्याचे वाढते दर हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत संवेदनशील बनले असून, जनतेचे हाल कमी करण्यासाठी सरकार अनुदान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा – Train Accident: दोन ट्रेनची समोरासमोर भीषण धडक; मृतदेहांचा खच, 81 जण रक्ताच्या थारोळ्यात
भविष्यातील ऊर्जा संतुलन राखण्याचे आव्हान
या भीषण संकटानंतर आता पाकिस्तान सरकार खडबडून जागे झाले असून ३० दिवसांचा ‘क्रूड ऑईल प्रोग्राम’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी तातडीने साठवणूक क्षमता वाढवण्याची गरज मंत्र्यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, जागतिक जोखीम लक्षात घेता पाकिस्तानने आपल्या ऊर्जा धोरणाची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे मलिक यांनी मान्य केले. मात्र, सध्याच्या घडीला पेट्रोलअभावी पाकिस्तानची जनता मोठ्या संकटात सापडली आहे.
याआधी काही महिन्यांपूर्वी मुनीर यांचे वक्तव्य
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानला त्यांची जागा दाखवणारे ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतरही काही महिन्यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अशाच प्रकारची कबुली दिली होती, ज्यातून पाकिस्तान भारतासमोर काहीच नाही, याची त्यांना जाणीव असल्याचे स्पष्ट दिसत होते. असीम मुनीर यांनी भारताची तुलना चमचमणाऱ्या मर्सिडीजशी केली होती तर, पाकिस्तान म्हणजे कचरा भरलेली गाडी असल्याचे म्हटले होते. यामुळे पाकिस्तानची स्वतःच्याच तोंडाने खिल्ली उडवल्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.