धाराशिव: धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याभोवतीचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. पक्षांतरानंतर स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या पक्षबदलाच्या घडामोडी सुरू असतानाच आता त्यांचे बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी थेट ओमराजे यांच्यावर जोरदार टीका करत खुलं आव्हान दिल्याने या वादाला नवं वळण मिळालं आहे.
राज्यातील शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी राजकीय चर्चा रंगली होती. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. त्यांच्या या निर्णयानंतर धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही लोकप्रतिनिधींनीही पक्षबदलाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसून आले.
भावाकडून थेट आव्हान
या पार्श्वभूमीवर मकरंदराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी पक्षबदलावर नाराजी व्यक्त करत मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. तसेच शिवसैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यानंतर धाराशिवमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चांना वेग आला आहे.
धाराशिवमध्ये पक्षांतरांची मालिका
ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर धाराशिव शहरातील काही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. याशिवाय कळंबमधील नऊ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात समीकरणे बदलताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटाने अधिक आक्रमक भूमिका घेतली असून पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.
आगामी निवडणुकांवर परिणाम?
धाराशिवमध्ये सुरू असलेल्या या राजकीय संघर्षाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला शिंदे गट आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे ठाकरे गटही आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे.