Pandit Deendayal Upadhyaya Institute of Archaeology Campus Vacant : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुमारे 289 कोटी रुपये खर्चून उभारलेली पंडित दीन दयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्था सध्या विद्यार्थ्यांविना ओस पडली आहे. या संस्थेच्या कॅम्पसची पुरातन अवशेषांसारखी स्थिती झाली आहे. तब्बल 25 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या संस्थेत प्रशस्त रस्ते, उंच इमारती आणि आधुनिक सोईसुविधा असूनही तिथे शिक्षणासाठी केवळ 15 विद्यार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या संस्थेची पायाभरणी केली होती, तर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केले होते. मात्र, उद्घाटनानंतर 7 वर्षे उलटूनही ही संस्था अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकली नाही.
धूळखात पडलेली साधनसामग्री आणि बंद लॅब
वृत्तानुसार, या संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मोठी वानवा असून सर्वत्र शांतता पसरलेली आहे. येथे भव्य वाचनालय आणि प्रयोगशाळा आहेत, मात्र त्या बहुतांश वेळा बंदच असतात, अशी माहिती येथील सुरक्षा रक्षकांनी दिली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील अनेक कार्यालये बंद असून तिथली महागडी साधनसामग्री धूळखात पडली आहे. विशेष म्हणजे, येथे शिकवण्यासाठी कोणताही नियमित शिक्षकवर्ग उपलब्ध नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे (ASI) अधिकारी आणि तज्ज्ञ येथे केवळ गेस्ट लेक्चरर म्हणून येतात आणि मार्गदर्शन करतात.
निश्चित अभ्यासक्रमाचा अभाव
या संस्थेतील शैक्षणिक पद्धतीवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी कोणताही निश्चित असा लेखी अभ्यासक्रम नाही, तर संपूर्ण शिक्षण हे फिल्ड ट्रेनिंग, प्रॅक्टिकल आणि एक्पोजरवर आधारित असल्याचे सांगितले जाते. येथील विद्यार्थी 60 दिवसांच्या फिल्ड व्हिजिटवर जातात आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करतात. मात्र, अधिकृत अभ्यासक्रम आणि नियमित परीक्षांविना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे केले जाते, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. क्लासरूम टीचिंगपेक्षा फिल्ड वर्कवर अधिक भर दिला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
विद्यार्थी संख्येची मोठी तफावत
या संस्थेतील ऑडिटोरियमची क्षमता 1000 जागांची असून संस्थेचा परिसर 25 एकरचा आहे, परंतु त्या तुलनेत विद्यार्थी संख्या अत्यंत नगण्य आहे. सध्या येथे केवळ 10 मुले आणि 5 मुली असे एकूण 15 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वर्दळ कमी असून केवळ सुरक्षा रक्षकच मोठ्या प्रमाणावर तैनात दिसतात. पुरातत्त्व क्षेत्रातील अभ्यासाचे प्रमुख केंद्र बनवण्याचा दृष्टिकोन ठेवून सुरू करण्यात आलेली ही संस्था आज विद्यार्थ्यांअभावी संघर्ष करताना दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.