दोन्ही राष्ट्रवादीत सध्या चलबिचल पाहायला मिळत आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बुधवारी 19 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. ही बैठक राजकीय परिस्थिती आणि विकासाच्या प्रकल्पांसह विविध विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं होतं. तसेच मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या बैठकीत त्या अनुषंगानेही चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तावण्यात आली होती. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले आहेत.
अशातच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची सध्या मुंबईत बैठक होत आहे. मुंबईतील पार्थ पवार यांचे वरळी येथील निवासस्थान सुभदा या ठिकाणी सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. काल रात्री मोजक्या मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर आज पुन्हा पार्थ पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीतील मंत्र्यांची बैठक होत आहे. शुक्रवारी पार्थ पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये मंत्री नरहरी झिरवळ बाबासाहेब पाटील छगन भुजबळ इंद्राणील नाईक उपस्थित होते.
तर आज होत असलेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल मंत्री नरहरी झिरवळ बाबासाहेब पाटील नाईक बैठकीला उपस्थित आहेत. महामंडळ आणि sir संदर्भामध्ये आणि पक्षातील इतर राजकीय विषयांवरती ही बैठक होत असल्याची चर्चा असून मागच्या अर्ध्या-पाऊण तासापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. पार्थ पवार यांनी लागोपाठ दोन दिवस बैठक घेतल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? अशी चर्चा रंगली आहे.
पुणे महापालिकेतील विकास निधी वाटपावरून वाद
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत घुसफूस सुरु असलेल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी पुण्याच्या निधी वाटपाच्या मुद्द्यावर भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. पुणे महापालिकेतील निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात नाराजी किंवा चर्चा सुरू असून, सत्ताधारी आणि इतर नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा संवाद साधण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापण्यात आल्याने दोन्ही पक्षातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत असून त्यात हा विषय निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.