राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना उधाण आलं आहे. खासदार पार्थ पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात एका टेंडरच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातील वाहतूक कंत्राटावरून दोघांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं बोललं जात असून या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाहतुकीसंदर्भात मोठं टेंडर काढण्यात आलं होतं. या टेंडर प्रक्रियेदरम्यान एका विशिष्ट ठेकेदाराला संधी मिळावी, यासाठी पार्थ पवार यांनी आग्रह धरल्याची चर्चा आहे. संबंधित ठेकेदाराला मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवण्यात आल्याचंही बोललं जात आहे. मात्र भुजबळ यांनी नियम आणि प्रक्रियेचा हवाला देत टेंडर मंजूर करण्यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. चर्चेनुसार, भुजबळ यांनी “अशा प्रकारे कधीही दबाव टाकला गेला नव्हता” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संभाषण अधिक तीव्र झाल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चांनंतर दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरण देत वादाच्या बातम्या फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना, ‘काही गोष्टी समजुतीने हाताळाव्या लागतात. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही,’ असं स्पष्ट केलं. त्यांनी कोणताही गंभीर मतभेद नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, पार्थ पवार यांच्या वतीनेही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी “पार्थ पवार यांच्याबाबत जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांनी कोणत्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही,” असं सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात अधिकृतरीत्या कोणताही वाद नसल्याचं दोन्ही बाजूंनी सांगितलं जात असलं तरी राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ आणि युवा नेतृत्वामध्ये समन्वयाच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. याआधीही काही निर्णय आणि पक्षातील अंतर्गत घडामोडींवरून वरिष्ठ नेते आणि तरुण पिढीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे आता पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची भर पडल्याने राजकीय चर्चांना अधिक रंग चढला आहे.
दरम्यान, या कथित वादानंतर विरोधकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील अंतर्गत तणाव आणि निर्णय प्रक्रियेवरून आता पुढील काही दिवसांत आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.