Nagarparishad-Nagarpanchayat Election Result : ‘काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून..’; निवडणुकांच्या निकालानंतर रोहित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया

निवडणुकीच्या निकालानंतर रोहित पवारांनी 'पैशांच्या राजकारणावर' तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, निवडून आलेल्या काही लोकांच्या धंद्यांची नावे चारचौघात घेतानाही लाज वाटते, अशी तीव्र प्रतिक्रियाही दिली.
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result : ‘काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून..’; निवडणुकांच्या निकालानंतर रोहित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया

Local Election Result : नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. जामखेडमधील पराभवाने व्यथित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरच गंभीर आरोप करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.

काँग्रेस नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेचा आणि समतेचा विचार मांडणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना स्वतःच्या तिकिटावर उभे केले. काँग्रेसने 'भाजपची बी-टीम' बनून जातीयवादी शक्तींना मदत केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. मित्रपक्षाच्या या "तिरक्या चालीमुळेच" निकाल फिरल्याचे सांगत, आता जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर भविष्यात कसा विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

स्वच्छ राजकारणापेक्षा पैशांचा प्रभाव?
निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना रोहित पवारांनी 'पैशांच्या राजकारणावर' तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य घरातील तरुण, शेतकरी आणि बचत गटातील महिलांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे आमचे स्वप्न होते, मात्र स्वच्छ राजकारणापेक्षा पैशांनी गढूळ झालेले राजकारण वरचढ ठरल्याचे ते म्हणाले. विकासाच्या आणि तत्वांच्या मुद्द्यांना डावलून ज्या प्रकारे पैशांचा वापर झाला, तो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नाउमेद करणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – Election Result 2025: राज्यात कुठे कोण जिंकले? कोकण ते मराठवाडा, विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी

विरोधकांच्या धंद्यांवरून बोचरी टीका
विरोधकांवर निशाणा साधताना रोहित पवारांनी त्यांच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केले. निवडून आलेल्या काही लोकांच्या धंद्यांची नावे चारचौघात घेतानाही लाज वाटते, अशी बोचरी टीका त्यांनी केली. अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे राजकारणाची पातळी घसरत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जनतेने आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असली, तरी हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि डोक्यात विचारांचे काहूर उठवणारा असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात?
या निकालाने आणि रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील दरी स्पष्टपणे दिसून येत आहे. केवळ भाजपनेच नव्हे, तर आघाडीतील मित्रपक्षाने आणि काही अपक्षांनी संगनमत करून आपल्याला पाडल्याची भावना रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे. आता काँग्रेस या आरोपांना काय उत्तर देते आणि आगामी काळात महाविकास आघाडीची एकी कायम राहते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: 'पक्ष नेतृत्वानेच गटबाजीला खतपाणी घातलं…'; मुनगंटीवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version