कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त कोल्हापुरातील नवदुर्गा दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी होते. या नवदुर्गाचे विशेष महत्त्व असून पूर्वी कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या या नवदुर्गा रक्षणकर्त्या होत्या. आता ही मंदिरे शहराच्या मुख्यकक्षेत आली आहेत. अंबाबाई मंदिराप्रमाणेच या नवदुर्गांचेही स्थान अढळ आहे. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गाची माहिती घेऊ..
आपल्याकडे पूर्वापार नवरात्राची परंपरा आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. अनेक ठिकाणी देवीची आराधना केली जाते. आई अंबाबाईसोबतच कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते. या नवदुर्गांवर भाविकांची मोठी श्रद्धा आहे.
हेही वाचा – Navratri 2025: अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना;15 स्क्रीनवरून देवीच्या पूजनाचं थेट प्रक्षेपण
एकांबिका (एकविरा)
कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी ही पहिली दुर्गा आहे. या एकांबिकेचे शहरामधील आझाद चौकातील कॉमर्स कॉलेजजवळ छोटेसे मंदिर आहे. ही एक शक्तिप्रधान देवता मानली जाते. यामुळे काहीशी उग्रही मानली जाते. या देवीला एकविरा, रेणुका आणि यल्लमा यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जाते.
मुक्तांबिका (मुकाम्बा देवी)
मुक्तांबिका किंवा मुकांबा ही नवदुर्गांमधील दुसरी दुर्गा आहे. दुर्गेचे ज्ञानमय आणि मुक्त स्वरूप म्हणून तिचे वर्णन केले जाते. मुक्तांबिका ही आदि शंकराचार्यांची उपास्यदेवता आहे. ही देवी कर्नाटकतील काही कुटुंबांची कुलदेवता देखील आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे, स्वामी विवेकानंदांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते. शहरातील मंगळवार पेठेतील साठमारी येथे विवेकानंद आश्रमाजवळ तिचे मंदिर आहे.
पद्मांबिका (पद्मावती देवी)
पद्मांबिका देवी ही नवदुर्गांपैकी तिसरी देवता आहे. तिला पद्मावती देवी असेही म्हटले जाते. ती नरसिंहाच्या रूपात असून, पाप नष्ट करणारी मानली जाते. जयप्रभा स्टुडिओजवळ या पद्मावती देवीचे मंदिर आहे.
फिरंगाई (प्रियांगी देवी)
पूर्वीच्या काळी कोल्हापूर शहर पाच लहान गावांचे मिळून बनले होते. या गावांची जी ग्रामदेवता होती, तिचे नाव 'फिरंगाई' होते. या देवीला प्रियांगी देवी असेही म्हणतात. ही नवदुर्गांच्या मालिकेत चौथी देवता आहे. या देवीला पीडा किंवा संकट दूर करणारी देवता मानले जाते. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल शाळेजवळ तिचे मंदिर आहे.
कमलांबिका देवी (कमलजा)
कमलजा किंवा कमलांबा किंवा कमलांबिका ही नवदुर्गा मालिकेतील पाचवी देवता आहे. या मंदिरात कमळात बसलेली देवीची मूर्ती आहे. कमलजा हे दुर्गेचे अभय प्रदान करणारे स्वरूप मानले जाते. अर्ध शिवाजी पुतळा येथून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना अपना बँकेजवळ पंत अमात्य बावडेकर यांच्या वाड्यात या देवीचे मंदिर आहे.
कलांबिका देवी (महाकाली)
नवदुर्गामधील सहावी देवता आहे, महाकाली किंवा कलांबिका. हे शक्तीचे प्रतीक आणि दुर्गेचे संहारक रूप मानले जाते. ही रामकृष्ण परमहंसांची उपास्यदेवता आहे. तसेच, ही नाथ संप्रदायाची देवता आहे. या देवीचे तोंड दक्षिणेला असल्यामुळे तिला दक्षिण कलिका असेही म्हणतात. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळ महाकालीचे मंदिर आहे.
अनुगाई देवी (अनुगामिनी)
अनुगामिनी ही नवदुर्गामधील सातवी देवता आहे. 'गम्' म्हणजे जाणे आणि 'अनु' म्हणजे पाठीमागून. ही देवता कोल्हापूरबाहेर मृत्यू झालेल्या आत्म्याला मुक्ती देते असे मानले जाते. रंकाळा टॉवर परिसरात अनुगामिनीचे मंदिर आहे. या मूर्तीला सहा हात असून तिची राक्षसाचा संहार करतानाची मुद्रा आहे.
गजांबिका देवी (गजलक्ष्मी)
गजलक्ष्मी किंवा गजांत लक्ष्मी ही नवदुर्गा मालिकेतील आठवी देवता आहे. मंदिरामध्ये तीन फूट उंचीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. गजलक्ष्मी हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. गजलक्ष्मीचे मंदिर तोरस्कर चौकाजवळील कुंभार गल्ली येथे आहे. पूर्वी हा परिसर ब्रह्मपुरी गावामध्ये येत होता.
श्रीलक्ष्मी
श्रीलक्ष्मी ही नवदुर्गामधील नववी आणि शेवटची देवता आहे. ही देवता संपत्ती आणि आरोग्य देणारी मानली जाते. महाराणा प्रताप चौकातील वजन मापे कार्यालयाच्या आवारातच तिचे मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी हत्ती महाल होता, जिथे शाहू महाराजांचे हत्ती राहायचे.
(Disclaimer : ही बातमी उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी जाणकारांशी संपर्क साधावा.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.