Narayan Rane Health Update: कोकणातील चिपळूण येथे आयोजित 'कृषी व पशुधन प्रदर्शन 2026' च्या उद्घाटन सोहळ्यात एक चिंताजनक घटना घडली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाषणादरम्यान अचानक भोवळ आली. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठी खळबळ उडाली होती.
व्यासपीठावरच प्रकृती खालावली
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. यावेळी त्यांच्या पत्नी निलम राणे यादेखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी त्यांना तात्काळ आधार देत खुर्चीवर बसवले. पाणी आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. चिपळूणमध्ये सध्या तापमानाचा पारा चढलेला असून कडाक्याचे ऊन आहे. याच उष्णतेचा त्रास नारायण राणे यांना जाणवला. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर राणे यांनी त्यांचा पुढील नियोजित दौरा पूर्ण केला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
राजकारणातून संन्यास घेणार? राणेंचे मोठे विधान
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आता दोन्ही मुलं (नितेश आणि निलेश राणे) राजकारणात सक्रियपणे काम करत आहेत, त्यामुळे आता मी थांबायला हवे, असे सूचक विधान त्यांनी केले. वाढत्या वयाचा आणि शारीरिक मर्यादांचा विचार करून, आपल्याला राजकारणातून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. इथून पुढे व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.