Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी येणारा आठवडा थोडा कठीण ठरणार आहे. शहरातील काही महत्त्वाच्या विभागांत तब्बल 30 तास पाणीपुरवठा पूर्णपणे थांबणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. जलवाहिन्यांच्या महत्त्वपूर्ण दुरुस्ती आणि नव्या पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामासाठी हा पुरवठा बंद करण्यात येत आहे. अमर महल भूमिगत बोगद्याशी संबंधित तांत्रिक कामे या काळात पार पडणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेनुसार, नागरिकांनी या दोन दिवसांसाठी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करावा आणि पाणी शक्य तितके काटकसरीने वापरावे. प्राप्त माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत केले जाणार आहे. यामुळे शहरातील काही भागात 30 तास पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. त्यानंतर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार आहे. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील अनेक वॉर्ड प्रभावित होणार आहेत.
हेही वाचा – BMC Elections 2025: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 11 सदस्यीय जाहीरनामा समिती जाहीर
पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणारे भाग –
दक्षिण आणि मध्य मुंबईतील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर वॉर्ड तसेच पूर्व उपनगरांतील एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस आणि एन वॉर्ड या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा, डोंगरी, मस्जिद बंदर, वरळी, परळ, सायन, वडाळा आणि शिवडी या भागातील पाणी पुरवठा 30 तासांसाठी बंद असेल.
पूर्व उपनगरांतील प्रभावित क्षेत्र:
याशिवाय, पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, चूनाभट्टी, गोवंडी, देवनार, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या भागातील काही परिसारातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच यातील काही भागांना कमी दाबावे पाणीपुरवठा होणार आहे.
बीएमसीचे नागरिकांना आवाहन
दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे कनेक्शन काम शहरातील पुढील अनेक वर्षांच्या जलपुरवठा सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नियोजित काम पुढे ढकलणे शक्य नाही. नागरिकांनी आवश्यक पाणी आधीच साठवून ठेवावे, दोन दिवस पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, आपल्या वॉर्डसंबंधित अद्यतनांसाठी अधिकृत प्रसिद्धिपत्रक तपासावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.