मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ च्या पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी आणि ‘ट्रायल रन’ला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखवला असून फडणवीस आणि शिंदे मेट्रोने प्रवास केला. हा 10 किलोमीटरचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
ट्रायल रन आणि मार्गाची माहिती
ही तपासणी मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 मध्ये होत आहे, ज्यात गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन यांचा समावेश आहे. या मार्गावरील उड्डाणपूल (Viaduct), मार्गिका (Track) आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांच्या गरजेनुसार सर्व तांत्रिक प्रणालींची तपासणी केली जात आहे.
हेही वाचा – Farmer compensation: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, या जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 553 कोटी मंजूर
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा मेट्रो मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून त्याची एकूण लांबी सुमारे 35 किलोमीटर आहे आणि यासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. या मार्गावरील मेट्रो 8 डब्यांची असणार आहे. हा मार्ग पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबईला जोडणार असल्यामुळे तो एक महत्त्वाचा दुवा ठरेल.
? 11.45am | 22-9-2025?Thane. LIVE | Media Interaction#Maharashtra #Thane https://t.co/EKpud4n05q — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 22, 2025
50% वेळ वाचणार; 21 लाख प्रवाशांना फायदा
फडणवीस म्हणाले की, हा संपूर्ण मार्ग 58 किलोमीटरचा असून, तो देशातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग असेल. यामुळे दररोज जवळपास 21 लाख लोक प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ 50 टक्के कमी होईल. तसेच, यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल.
फडणवीस यांनी सांगितले की, “आज हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे. टप्प्याटप्प्याने पुढील वर्षाच्या अखेरीस सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
एकनाथ शिंदेंचे विशेष अभिनंदन
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आपल्याला मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणीतून मार्ग काढत डेपोसाठी जागा मिळवून दिली.” त्यांनी आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.