मुंबई : मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासमोरच महापौर रितू तावडे आणि ज्येष्ठ नगरसेविका तथा शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात जोरदार वाद रंगला. त्यावर अमित साटम यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून सामान्य मुंबईकरांसाठी काम करा, अशा कडक शब्दात दोन्ही महिला नेत्यांना समज दिली. मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या सर्वच नगरसेवकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीच्या आधी भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर यांच्यासोबत बैठक घेतली. याच बैठकीत मुंबई महापालिकेत पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सभागृह नेते यांना अंतर्गत वादाबाबत अमित साटम यांच्याकडून विचारणा करण्यात आली. तसेच सदस्यांच्या मतभेदावर आणि समन्वयाचा अभाव याची कारणे ही विचारण्यात आली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नाराजगी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकंदरीत महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले असल्याचेही समजते. महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्याने अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असताना महापौरांनी ‘झारीतील शुक्राचार्य’ बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली असल्याने यावरही महापौरांना विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महापौर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्याची ही कारणे महापौरांना विचारण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोर महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.