Bhaskar Jadhav on Alfonso Mango : ‘गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा का द्यायचा? तो कोकणातल्या आंब्याचं पेटंट आहे. कोकणातल्या हापूसला जीआय मानांकन आहे. कर्नाटकातला आंबा हापूस म्हणून विकला जाऊ नये यासाठी नेहमीच संघर्ष होत राहतो. हापूस केवळ कोकणातलाच आहे,’ असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला.
‘कोकणला फार सोयी-सुविधा मिळत नाहीत. कर्जमाफीचा फारसा फायदा होत नाही. आता कोकणचं खास वैशिष्ट्य असलेला हापूस कोकणकडून काढून कोणालाही देऊ नका,’ अशी मागणी जाधव यांनी केली. ‘वलसाडच्या आंब्याला दुसरी कोणतीही ओळख द्या. त्यांना तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार विशेष नाव देता येईल; मात्र, हापूस कोकणचाच राहील,’ असे ते म्हणाले.
वलसाडच्या आंब्याला हापूसची ओळख मिळण्याची मागणी
गुजरातने वलसाड हापूस या नावाने भौगोलिक संकेत (जीआय टॅग) मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे जगप्रसिद्ध कोकणचा हापूस आंबा आता एका नव्या वादात सापडला आहे. आता कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकण हापूसला 2018 मध्ये जीआय टॅग मिळाला होता, जो या आंब्याला बाजारात एक विशिष्ट ओळख आणि संरक्षण देतो.
गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी 2023 मध्ये वलसाड हापूससाठी जीआय टॅगचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडली आहे. हा प्रकार कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा – Bharat Gogawale Reaction : कॅशबॉम्ब व्हिडीओवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझ्याकडे पैसा…’
हापूस कोकणातल्या शेतकऱ्यांचा आधारस्तंभ
कोकण हापूसला मिळालेला जीआय टॅग हा केवळ एक ओळखपत्र नाही, तर तो शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ आहे. या टॅगमुळे आंब्याला एक विशिष्ट दर्जा प्राप्त होतो, ज्यामुळे त्याची किंमत आणि बाजारपेठेतील स्थान टिकून राहते. हा टॅग 2018 मध्ये मंजूर झाला होता, ज्यामुळे कोकणच्या हापूस आंब्याला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली होती. जर वलसाड हापूसला जीआय टॅग मिळाला, तर कोकणच्या अस्सल हापूस उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान होईल, असे कोकणचे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी म्हणत आहेत. या सर्व परिस्थितीवरून कोकणाचे खास वैशिष्ट्य असलेल्या हापूस आंब्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. (Gujarat Claims for Hapus GI Tag Raising Concerns among Konkan Farmers and Exporters)
मत्स्यव्यवसायाला पाठबळाची गरज
दरम्यान, भास्कर जाधव यांनी मत्स्यविकासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी सरकारला धन्यवाद दिले. तसेच, मत्स्यविकास मंत्र्यांचेही आभार मानले. 10-15 वर्षे सातत्याने संघर्ष केल्यानंतर आता या व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला आहे. मात्र, हा दर्जा कशा पद्धतीने दिला आहे आणि याचा मत्स्यव्यावसायिकांना कसा फायदा होईल, ते स्पष्ट झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Konkan Hapus Mango : गुजरातचा डोळा आता हापूसवर, कोकण आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नेमकं प्रकरण काय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.