Manoj Jarange Patil: आंदोलनाची परवानगी नाकारली, जरांगे पाटील आक्रमक; म्हणाले, ‘आडमुठं धोरण आम्हाला…

आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. सरकारवर गंभीर आरोप करत त्यांनी आंदोलन ठरल्याप्रमाणे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Manoj Jarange Patil: आंदोलनाची परवानगी नाकारली, जरांगे पाटील आक्रमक; म्हणाले, ‘आडमुठं धोरण आम्हाला…

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. परवानगी नाकारण्यात आल्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही संविधानाप्रमाणे चालतो, मात्र सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते, असं जरांगे पाटील म्हणाले.

परवानगी नाकारण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत आंदोलन करण्यासंदर्भात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली असताना पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारणं योग्य नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता आणि त्यावेळी आम्ही शांततेत आंदोलन केलं. यंदाही गणेशोत्सवाची मिरवणूक ठरल्याप्रमाणे होईल आणि आम्हीही ठरल्याप्रमाणे उपोषण करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतर पुढील कायदेशीर लढाईसाठी वकील आजपासून कामाला लागतील, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. पोलीस आयुक्तांकडे दाद मागायची की पुढील कोणती कायदेशीर पावले उचलायची, याचा निर्णय वकील घेतील, असं त्यांनी सांगितलं

पोलिसांनी सोयीनुसार कायदा लागू करू नये, असा आरोप करत जरांगे पाटील यांनी पोलीस प्रशासनावरही टीका केली. पोलीस निरीक्षकांनी कायदा पायाखाली तुडवला असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य अस्थिर करण्याचं काम आम्ही करत नसून मुख्यमंत्रीच राज्य अस्थिर करत असल्याचा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. “गेल्यावर्षी कायदा नव्हता का? आता नवीन कायदा चालवणारे झाले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांना न्यायदेवतेसह सर्वांचा अवमान करायचा आहे, असा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

“आम्ही आदेश पाळून आंदोलन करणार आहोत. ही हुकूमशाही आणि गुंडगिरी आहे. मी तुम्हाला शरण येणार नाही, गुडघे टेकणार नाही. आडमुठ्या सरकारचं धोरण आम्हाला मान्य नाही,” असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

याचबरोबर, आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आपण पाणी आणि औषधोपचारही बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य अस्थिर करण्याची इच्छा आम्हाला नाही, मात्र या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number