Manoj Jarange: सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत, मागण्या मान्य करण्याचं आश्वासन; पण जरांगेंचा स्पष्ट नकार, ‘लेखी निर्णयाशिवाय माघार…

अंतरवाली सराटीतील आंदोलनात सरकारने १० सप्टेंबरपर्यंत निर्णयाचे आश्वासन दिले, तरी मनोज जरांगे पाटील माघार घेण्यास तयार नाहीत.

Manoj Jarange: सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत, मागण्या मान्य करण्याचं आश्वासन; पण जरांगेंचा स्पष्ट नकार, ‘लेखी निर्णयाशिवाय माघार…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात बुधवारी मोठा राजकीय आणि भावनिक ट्विस्ट पाहायला मिळाला. सहाव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक मागण्या मान्य केल्याचा दावा केला. १० सप्टेंबरपर्यंत महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी होईल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, या आश्वासनांवर समाधान न मानता जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.

सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील आणि प्रसाद लाड यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत लेखी निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली.

सरकारने कोणती आश्वासने दिली?

बैठकीनंतर मंत्र्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. १० सप्टेंबरपर्यंत आवश्यक शासन निर्णय (जीआर) काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जात प्रमाणपत्राच्या कामासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. मराठा समाजासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची तयारी सुरू असून, अण्णासाहेब पाटील महामंडळाशी संबंधित प्रलंबित बाबींनाही गती दिली जाणार आहे.

शिंदे समितीच्या माध्यमातून लाखो नोंदींची पडताळणी करण्यात आली असून, अनेक विद्यार्थ्यांना एसईबीसीअंतर्गत प्रमाणपत्रे मिळाल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

जरांगे यांची स्पष्ट भूमिका

सरकारच्या आश्वासनांनंतरही मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. “जर निर्णय होणारच असेल, तर १० सप्टेंबरपर्यंत तो प्रत्यक्षात का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी आंदोलकांना संबोधित करत सांगितले की, ११ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्यांवर ठोस निर्णय झाला, तर १२ सप्टेंबरला आनंदोत्सव साजरा करत मुंबईकडे कूच केली जाईल. “गुलाल घेऊन मंत्रालयात जाऊ,” असे म्हणत त्यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं

बैठकीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील बोलत असताना आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ भाषण थांबवावे लागले. विखे पाटील यांनी आंदोलकांना शांत करत, “आम्ही तुमच्यातलेच आहोत आणि मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत,” असे सांगत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

प्रकृती खालावली, तरी आंदोलन कायम

सहा दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी उपचार घेण्याचा आग्रह धरला. मात्र, आंदोलनाचे ध्येय पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केल्याने अंतरवालीतील आंदोलन आणखी निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number