Nashik Election 2026: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये कमालीचा राजकीय थरार पाहायला मिळाला. ‘एबी’ फॉर्मवरून भाजपमध्ये उभी फूट पडली असून, संतप्त कार्यकर्त्यांनी चक्क भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. निष्ठावंतांना डावलल्याच्या भावनेतून कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून, नाशिक भाजपमध्ये सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे.
महामार्गावर तासाभराचा थरार
भाजप यंदा नाशिकच्या सर्व 122 जागांवर स्वबळावर लढत आहे. मात्र, शेवटचा दिवस उजाडला तरी अनेक इच्छुकांना पक्षाचे अधिकृत फॉर्म मिळाले नाहीत. शहराध्यक्ष सुनील केदार फॉर्म घेऊन निघाल्याचे समजताच, पंचवटी आणि सिडको परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी महामार्गावर त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. हा थरार जवळपास तासभर सुरू होता. केदार एका खासगी फार्महाऊसवर लपल्याची खबर मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली आणि बंद असलेल्या फार्महाऊसचे मुख्य गेट तोडून आत प्रवेश केला.
संकटमोचक गिरीश महाजन ‘नॉट रिचेबल’
नाशिक भाजपचे सर्वेसर्वा आणि संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन ऐनवेळी संपर्काबाहेर गेल्याने कार्यकर्त्यांच्या आक्रोशात अधिकच भर पडली आहे. नेत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी थेट तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 15-20 वर्षे पक्षासाठी रक्त आटवणाऱ्यांना बाजूला सारून धनदांडग्यांना उमेदवारी विकली जात असल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.
पोलीस आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. तिकीट वाटपाच्या ठिकाणी आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू असताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून ही गर्दी पांगवली असून, सध्या संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.