राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्षांना ईओडब्ल्युने ताब्यात घेतले आहे. तब्बल 9 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांवर बसला आहे. माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटांवर गुंतवणुकीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. यासंदर्भात त्यांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय योजना, जमीन व्यवहार आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांना पुणे पोलिसांनी श्रीगोंद्यातून अटक केली. राहुल मोटेदार यांच्या फिर्यादीवरून पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.
मे 2025 मध्ये दाखल या प्रकरणात सुरुवातीला 2 कोटी 60 लाखांचा व्यवहार उघड झाला होता, मात्र तपासात ही फसवणूक 9 कोटी 49 लाख 35 हजार रुपयांपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि 'एमपीआयडी' (MPID) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने बिगरजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावलेले नाहाटा दीर्घकाळापासून फरार होते. या प्रकरणातील अजय चौधरी आणि रविराज जोशी या अन्य दोन आरोपींना पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मोरे पुढील तपास करत आहेत.