Municipal Election 2026: निवडणुकीआधीच निकाल? राज्यभरात महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध

महापालिका निवडणुकांत राज्यभरात महायुतीचे ६०हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

Municipal Election 2026: निवडणुकीआधीच निकाल? राज्यभरात महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध

Municipal Election 2026: राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान यंदा एक वेगळाच राजकीय ट्रेंड पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अनेक ठिकाणी निवडणूक थेट बिनविरोध झाली असून, सत्ताधारी महायुतीचे ६०हून अधिक उमेदवार कोणतीही लढत न करता विजयी ठरले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात ‘बिनविरोध’ निवडणुकीचा नवा पायंडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सामान्यतः महापालिका निवडणुकांमध्ये एखाद-दुसऱ्या प्रभागातच बिनविरोध निकाल लागतो. मात्र यंदा ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, पनवेल, भिवंडी-निजामपूर अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांनाच याचा लाभ झाल्याचे दिसून येते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी वादावादी, आरोप-प्रत्यारोप, तर काही ठिकाणी थेट अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचे गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी शासकीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ६ असे एकूण २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील चार महापालिकांमध्ये एकूण १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यात भाजप, शिंदे गट आणि स्थानिक पक्षांचा समावेश आहे. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील महापालिकांमध्ये कोणत्याही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही, हे विशेष.

दरम्यान, निवडणूक बिनविरोध कशी झाली, यावरून राजकीय वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी पैशांचे आमिष, धमकी, दबाव आणि अर्ज बाद करण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. काही उमेदवारांनी थेट पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवरही गंभीर आरोप झाले आहेत. आम आदमी पक्षाने विधानसभा अध्यक्षांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आणि अर्ज स्वीकारू नयेत यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

आतापर्यंत महापौर निवडणुकीत ‘घोडेबाजार’ होत असल्याची चर्चा असायची. मात्र यंदा थेट महापालिका निवडणुकीपूर्वीच दबावाचे राजकारण दिसून आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या ‘बिनविरोध’ विजयानंतर लोकशाही प्रक्रियेवर आणि निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number