मुंबई महापालिकेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सभा आयोजित करण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात थेट फोनवर शाब्दिक वाद झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकाराची महापालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांच्यासह आणखी चार सदस्यांनी केली होती. यासंदर्भातील सह्यांचे पत्र महापौर कार्यालयात वारंवार सादर करण्यात आले. मात्र, या पत्रावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर पेडणेकर महापौर कार्यालयाबाहेरील कर्मचारी विभागात गेल्या आणि तेथील कर्मचाऱ्यांना प्रलंबित पत्रांबाबत जाब विचारला. प्रशासनाकडून वेळेत उत्तर दिले जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापौर रितू तावडे त्या वेळी दालनात उपस्थित नसल्याने दोघींची प्रत्यक्ष भेट झाली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळताच महापौरांनी किशोरी पेडणेकर यांना दूरध्वनीवर संपर्क साधला.
फोनवरील संभाषणादरम्यान महापौर ऋतू तावडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना जाब विचारणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. त्यावर प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी आपण महापौरांच्या वैयक्तिक दालनात गेलेल्या नसून बाहेरील कर्मचारी कार्यालयात गेल्याचे स्पष्ट केले. ते कार्यालय सर्व लोकप्रतिनिधींसाठी खुले असून, संबंधित कर्मचारी कामकाजाबाबत उत्तर देत नसल्याने त्यांना प्रश्न विचारल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचे समोर आले. पावसाळ्याच्या तयारीसारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू झालेला हा वाद काही काळ चर्चेचा विषय ठरला.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणे, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाई आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या विषयावर विशेष सभा घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीवरूनच आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे.