Crime News : कन्नड चित्रपटसृष्टीतील एका भयंकर आणि धक्कादायक गुन्ह्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले आहे. चित्रपटांमध्ये गुन्हेगारीच्या अनेक कथा आपण पाहतो, मात्र वैयक्तिक आयुष्यातील एका प्रेमसंबंधासाठी अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या नवीन बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याच्या ओढीने या अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कोण आहे ही अभिनेत्री?
उर्मिला, जिला चित्रपट वर्तुळात बिंदू म्हणूनही ओळखले जाते, तिने 'बजरंगी', 'पोलीस क्वार्टर्स' आणि 'कालभैरव' यांसारख्या प्रसिद्ध कन्नड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. बिंदू तिचा पती आणि कुटुंब सोडून मोहन राव नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मोहन रावचा छोटा फायनान्स व्यवसाय होता आणि तोदेखील आपल्या पत्नीपासून वेगळा राहात होता. सुमारे 2 महिन्यांपूर्वी या दोघांनी बंगळुरूच्या मंजनाथ नगरमध्ये एक घर भाड्याने घेतले होते.
बॉयफ्रेंडसाठी रचला हत्येचा कट
मोहन राव यांच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असतानाच बिंदूचे विनय नावाच्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडले. तिला विनयशी लग्न करायचे होते, परंतु मोहन राव हा त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत होता. अखेर बिंदू आणि विनयने मिळून मोहनला कायमचे संपवण्याचा कट आखला. या कटात विनयचा मित्र धनुष हा देखील सामील झाला होता. त्यांनी ही हत्या पूर्ण नियोजनानिशी केल्याचे समोर आले आहे.
पार्टीच्या बहाण्याने केला गेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी बिंदू आणि मोहनच्या घरात एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत मोहनला भरपूर दारू पाजण्यात आली. मोहन नशेत असताना विनय आणि धनुषने त्याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. जेव्हा मोहन जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला, तेव्हा बिंदूने क्रूरतेचा कळस गाठत त्याच्या तोंडावर आणि नाकावर पट्टी बांधली, जेणेकरून त्याचा आवाज बाहेर जाणार नाही. तसेच त्याचे हात-पाय बांधून त्याला हतबल करण्यात आले. अतिरक्तस्राव आणि गुदमरल्यामुळे मोहनचा मृत्यू झाला.
तपासाअंती उघडकीस आला गुन्हा
या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून बिंदू आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी एका महिन्याच्या आत घर सोडण्याचे सांगून भाडे करारही केला नव्हता, जेणेकरून गुन्ह्यानंतर पसार होणे सोपे होईल. मात्र, तांत्रिक पुरावे आणि संशयास्पद हालचालींमुळे हा बनाव उघडकीस आला. या धक्कादायक घटनेमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांच्या खासगी आयुष्यातील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.