Suraj Chavan Wedding : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. सोशल मीडियावर झालेल्या प्रचंड चर्चेमुळे या लग्नसोहळ्याला इतकी गर्दी झाली की, मंडपात गोंधळाची परिस्थिती (Chaos in Suraj Chavan Wedding) निर्माण झाली. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 50 हून अधिक बॉडीगार्ड्स तैनात करण्यात आले होते, तरीही गोंधळ थांबला नाही. या गोंधळाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवी किल्लेकरचा भर मंडपात संताप
लग्नमंडपात इतकी प्रचंड गर्दी झाली होती की, ठरलेल्या वेळेत लग्न लागते की नाही, अशी शंका निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने पुढाकार घेतला. गोंधळ थांबवण्यासाठी तिने माईक हातात घेतला आणि पाहुण्यांना थेट विनंतीवजा दम दिला. जान्हवीने गोंधळ घालणाऱ्या पाहुण्यांना उद्देशून म्हटले, “अरे आपण सूरजच्या लग्नाला आलोय ना… त्याचं लग्न तर लागू देत आधी, त्याचं लग्न लागू नये, असं तुम्हाला वाटतंय का? तो सूरज आतमध्ये बसला आहे, वैतागलाय तो. कृपया थोडं सहकार्य करा… मी हात जोडून सांगते, ऐका माझं.”
नवरदेवाची वरातही गोंधळात
गोंधळामुळे सूरज वैतागला असल्याचे सांगत, जान्हवीने पाहुण्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “सगळ्यांचीच डोकी फिरली आहेत, पण आता सूरजला बाहेर तर येऊद्या, कोणी काही करू नका… त्याच्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात,” असे म्हणत तिने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, या लग्नसोहळ्यातील वरातीचा (Suraj Chavan Wedding Procession) एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यात पांढऱ्या घोडीवर बसलेला सूरज गाण्याच्या तालावर थिरकत असताना घोडा अनियंत्रित (Horse Uncontrolled) झाल्याचे दिसते. त्यामुळे सूरज चव्हाणच्या डोक्यावरील नवरदेवाचा फेटाही खाली पडला होता.
‘करवली’ म्हणून जान्हवीचे कौतुक
सिनेसृष्टीतील कलाकारांपैकी फक्त जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) हीच सूरजच्या लग्नाला उपस्थित होती. तिने करवली म्हणून आपले कर्तव्य चोख बजावले. हळद, मेंदी आणि गावदेव यांसारख्या सर्व सोहळ्यांमध्ये ती सूरजसोबत होती. लग्नाच्या दिवशी झालेल्या गर्दीच्या गोंधळात तिने परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे नेटिझन्सनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
हेही वाचा – Rohit Raut: मराठमोळ्या गायकाची कमाल! रोहित राऊत झाला I-Popstar शोचा विजेता; बक्षीसाची रक्कम वाचून थक्क व्हाल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.