महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली होती. राज्य सरकारकडून महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
‘लाडकी बहीण योजने’योजनेतील सहभागी लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी व्यापक पातळीवर अर्जांची छाननी मोहीम राबवण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेदरम्यान ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
सुरुवातीला 2 कोटी 48 लाख महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. आता या संख्येत 92 लाखांची घट झाली असून संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार 164 इतकी राहिली आहे. फेब्रुवारी 2025 पासून व्यापक पातळीवर सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. या पडताळणी प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची अपूर्तता, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे आणि e-KYC न होणे यांसारख्या त्रुटींमुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. मात्र आता 92 लाख महिलांना अपात्र ठरवल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणि पात्रतेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले.