मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एका निर्णयाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका आता 25 लाखाचा खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापौरांच सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाहून अधिक खर्च जाणार असून 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी 25 लाख 12 हजार 786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतूदिनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या अगोदर महापौरांच जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निवेदेवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.