How to confirm Railway Ticket?: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी लोक प्रवास करत असल्यामुळे अनेकदा आगाऊ पैसे भरूनही प्रवाशांना वेटिंग लिस्टचा (Waiting List) सामना करावा लागतो. जर रेल्वेचे तिकीट रिझर्व्ह नसेल, तर प्रवास अत्यंत गैरसोयीचा आणि कष्टाचा ठरतो. मात्र, आयआरसीटीसी (IRCTC) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर एक अत्यंत उपयुक्त फिचर दिले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता. अनेक प्रवासी तिकीट बुक करताना एका साध्या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अनेकदा त्यांचे तिकीट वेटिंगमध्येच राहते.
काय आहे हा 'ऑप्ट' पर्याय आणि तो कसा काम करतो?
तिकीट बुक करताना आयआरसीटीसी आपल्याला एक विशेष पर्याय देते, ज्याला 'Opt Vikalp' (ऑप्ट विकल्प) असे म्हटले जाते. हे फिचर रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर (Chart Preparation) खऱ्या अर्थाने कार्यन्वित होते.
– ही पद्धत कशी काम करते? : समजा तुम्ही तिकीट बुक केले आहे आणि चार्ट तयार झाल्यानंतरही तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्येच राहिले, तर आयआरसीटीसीची यंत्रणा तुमच्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधते.
– दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा: तुम्ही 'Opt Vikalp' हा पर्याय निवडलेला असल्यास, तुमच्याच मार्गावर आणि त्याच गंतव्य स्थानाकडे जाणाऱ्या इतर पर्यायी रेल्वे गाड्यांमध्ये रिकामी जागा आहे का, याचा शोध घेतला जातो.
– अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवास: जर दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा उपलब्ध असेल, तर तुमचे तिकीट त्या ट्रेनमध्ये कन्फर्म केले जाते. विशेष म्हणजे, या संपूर्ण सुविधेसाठी प्रवाशांना एकही अतिरिक्त पैसा खर्च करावा लागत नाही.
'ऑप्ट विकल्प' कसा निवडावा? स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तिकीट बुक करताना खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
– सर्वप्रथम तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून IRCTC ची वेबसाइट किंवा अधिकृत ॲपवर लॉग इन करा.
– त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी प्रवास करायचा आहे ती तारीख आणि संबंधित ट्रेन निवडा.
– प्रवाशांची सर्व आवश्यक माहिती (Passenger Details) अचूक भरल्यानंतर स्क्रीन खाली स्क्रोल करा.
– खाली तुम्हाला 'Other Preferences' नावाचे एक सेक्शन दिसेल. या सेक्शनमध्येच 'Opt Vikalp' हा पर्याय दिलेला असतो, त्यावर टिक (Tick) करा.
– ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची नेहमीप्रमाणे तिकीट बुकिंगची अंतिम प्रक्रिया पूर्ण करा. ही सोपी ट्रिक वापरल्यास रेल्वे प्रशासन तुमच्या तिकिटाचा अन्य गाड्यांमधील रिकाम्या जागेसाठी विचार करते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.