IndiGo Flights Cancellation : देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा (IndiGo) गोंधळ सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. गुरुवारी पायलटसाठी (Pilot) लागू केलेल्या नवीन ड्यूटी आणि विश्रांती कालावधीच्या (FDTL – Flight Duty Time Limitations) नियमांमुळे क्रूची (Crew) तीव्र कमतरता जाणवत आहे. या कारणामुळे तीन प्रमुख विमानतळांवर इंडिगोची 200 हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या एका सूत्राच्या माहितीनुसार, गुरुवारी केवळ मुंबईत 86 उड्डाणे रद्द झाली, ज्यात 41 आगमन आणि 45 प्रस्थान समाविष्ट होते.
प्रमुख विमानतळांवर सर्वाधिक फटका
बंगळुरुमध्ये 73 उड्डाणे रद्द झाली, ज्यात 41 आगमने होती; तर दिल्लीतही 33 उड्डाणे रद्द झाली. दिवसाअखेरीस हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरला 6 प्रमुख विमानतळांवर (दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैदराबाद) इंडिगोच्या वेळेवर उड्डाण करण्याच्या (On-time Performance) कामगिरीत मोठी घसरण झाली. 2 डिसेंबरला नोंदवलेल्या 35 टक्क्यांहून कमी होऊन ही कामगिरी 19.7 टक्क्यांवर आली.
संपामागील 'अनेक अनपेक्षित' कारणे
नवीन FDTL नियमांमुळे पायलटसाठी विश्रांतीचा कालावधी वाढवणे आणि रात्रीच्या ड्युटीमध्ये कपात करणे बंधनकारक झाले आहे. याच कारणामुळे इंडिगोच्या नेटवर्कमध्ये मोठा व्यत्यय (Disruption in Indigo Network) निर्माण झाला आहे. इंडिगोने गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, 'अनेक अनपेक्षित कार्यात्मक आव्हाने' (Multitude of unforeseen operational challenges) या संकटास कारणीभूत आहेत. यात तांत्रिक बिघाड (Technology Glitches), हिवाळ्यातील वेळापत्रक बदल, प्रतिकूल हवामान आणि एव्हिएशन सिस्टीममधील वाढती गर्दी यांचा समावेश आहे. कंपनीने या गोंधळाबद्दल माफी मागितली आहे. तसेच, 48 तासांत सेवा पुन्हा पूर्ववत केली जाईल, असे म्हटले आहे.
DGCA ने मागितला सविस्तर अहवाल
नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या विमानांच्या रद्दीकरणाची (Cancellations) दखल घेतली आहे. DGCA परिस्थितीचे पुनरावलोकन करत असून, इंडिगोला या बिघाडाच्या कारणांवर सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, इंडिगोच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन परिस्थितीचे मूल्यांकन आणि निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी इंडिगोने 'कॅलिब्रेटेड ॲडजस्टमेंट्स' सुरू केल्या आहेत, असे इंडिगोने सांगितले.
पायलट संघटनेकडून गंभीर चिंता
फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने (Federation of Indian Pilots) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नवीन FDTL नियम पूर्णपणे लागू करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळाला असतानाही इंडिगोने भरती थांबवली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पायलट संघटनेने DGCA कडे मागणी केली आहे की, नवीन FDTL नियमांनुसार सुरक्षितपणे आणि विश्वसनीयपणे उड्डाणे करण्यासाठी एअरलाइनकडे पुरेसा कर्मचारी वर्ग असल्याशिवाय सीझनल फ्लाईट शेड्यूलला (Seasonal Flight Schedule) मंजुरी देऊ नये. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगो आपली वचनबद्धता पूर्ण करू शकल्यास, पायलट संस्थेने इंडिगोचे स्लॉट इतर एअरलाईन्सना पुन्हा वाटप करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा – PMCH मध्ये मोठा गोंधळ; ज्युनिअर डॉक्टर्सच्या संपामुळे OPD आणि इमर्जन्सी सेवा ठप्प, 2000 रुग्ण माघारी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.