IND vs NZ Final 2026: सूर्या आणि कंपनीकडे इतिहास रचण्याची संधी; पण मोदी स्टेडियमवरचा ‘तो’ रेकॉर्ड ठरतोय भारतासाठी डोकेदुखी

या मैदानावर आजवर झालेल्या सामन्यांचे निकाल पाहता, नाणेफेक (Toss) जिंकणाऱ्या संघाला नेमका काय फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे.
IND vs NZ Final 2026: सूर्या आणि कंपनीकडे इतिहास रचण्याची संधी;  पण मोदी स्टेडियमवरचा ‘तो’ रेकॉर्ड ठरतोय भारतासाठी डोकेदुखी

IND vs NZ T20 Final 2026 : T20 विश्वचषकाचा अंतिम थरार आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महामुकाबल्यापूर्वी मैदानाची आकडेवारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर आजवर झालेल्या सामन्यांचे निकाल पाहता, नाणेफेक (Toss) जिंकणाऱ्या संघाला नेमका काय फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असून न्यूझीलंडसाठी हे मैदान आतापर्यंत 'अनलकी' ठरले आहे.
अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा 'दबदबा'
भारतीय संघाचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 10 टी-20 सामने खेळले असून, त्यापैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. भारताने येथे इंग्लंड, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडलाही धूळ चारली आहे. चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतासाठी हे मैदान घरासारखे आहे. मात्र, 2021 नंतर भारताने याच मैदानावर 3 सामने गमावले आहेत, ही बाब चिंतेची ठरू शकते.

न्यूझीलंडची पाटी कोरीच; 'अहमदाबाद' ठरतंय अडथळा
दुसरीकडे, न्यूझीलंड संघासाठी हे मैदान दु:स्वप्न ठरले आहे. किवी संघाने या स्टेडियमवर आतापर्यंत 2 टी-20 सामने खेळले आहेत आणि दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडने 5 विजय आणि 2 पराभवांसह फायनलमध्ये धडक मारली आहे. फिन ॲलेनच्या तुफानी शतकाच्या जोरावर त्यांनी दक्षिण आफ्रिकेला नमवले असले, तरी अहमदाबादमध्ये विजयाचे खाते उघडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

हेही वाचा – T20 World Cup Final: भारत-न्यूझीलंड अंतिम सामना रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या ICC चे नियम

यंदाच्या वर्ल्ड कपमधील 6 सामन्यांचे गणित
यंदाच्या टी-20 विश्वचषकातील एकूण 6 सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडले आहेत. या सामन्यांचे निकाल संमिश्र आहेत:
प्रथम फलंदाजी: 3 संघांनी विजय मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग: 2 संघांना यश आले.
बरोबर (Tie): 1 सामना बरोबरीत सुटला.
या आकडेवारीवरून नाणेफेक जिंकून नेमका काय निर्णय घ्यावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारताने यंदा या मैदानावर 2 सामने खेळले, त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी
सूर्या आणि कंपनीकडे आज इतिहास रचण्याची संधी आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला, तर सलग दोनवेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. यापूर्वी न्यूझीलंडने 2021 मध्ये फायनल गाठली होती, मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता या तिसऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंड आपला 'अहमदाबाद'चा शाप मोडणार की भारत विश्वविजेता ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – T20 World Cup Final Recharge Plans: आता घरबसल्या लुटा फायनल मॅचचा आनंद, एअरटेल, जिओ आणि व्हीआयने लॉन्च केला आतापर्यंतचा स्वस्त प्लॅन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version