IIT Kanpur MANAS Network: मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. IIT कानपूरने ‘मानस-मुंबई एअर नेटवर्क फॉर अॅडव्हान्स्ड सायन्सेस’ हे अत्याधुनिक एअर मॉनिटरिंग नेटवर्क अधिकृतरित्या सुरू केले असून, यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता आता मिनिटा-मिनिटाला तपासता येणार आहे. सध्या शहरात 30 एअर क्वालिटी सेन्सर्स कार्यरत आहेत. नव्या प्रकल्पात आणखी 75 सेन्सर्स बसवले जाणार असून, पहिल्यांदाच वॉर्ड आणि परिसर-स्तरावर इतका सूक्ष्म डेटा मिळणार आहे. संपूर्ण नेटवर्क सुरु होण्यासाठी अंदाजे एक वर्ष लागेल.
हवेच्या निरीक्षणाला मिळणार नवीन दिशा
मानस नेटवर्कामुळे तयार होणारा अल्ट्रा-लोकल डेटा सरकार आणि महापालिकेला विशिष्ट भागातील प्रदूषणाची पातळी समजून घेऊन त्यावर वेळेवर उपाययोजना करण्यास मदत करेल. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा उपक्रम लाँच करताना सांगितले, 'वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची पर्यावरणीय किंमत आपण पाहतो आहोत. पण प्रगत तंत्रज्ञान आणि मायक्रो-लेव्हल मॉनिटरिंगच्या साहाय्याने वेळेवर आणि प्रभावी कारवाई करण्याची क्षमता वाढणार आहे.'
हेही वाचा – Mumbai Local Name Change : मुंबई लोकल मार्गावरील 'या' स्थानकाच्या नावात अचानक बदल, कारण समोर
किफायतशीर आणि स्वदेशी तंत्रज्ञान
नवे मॉनिटरिंग युनिट फक्त 50,000 किमतीचे असून, जुन्या सिस्टिमच्या तुलनेत हे अत्यंत स्वस्त आहे. पारंपारिक एअर मॉनिटरिंग सिस्टीमची किंमत सरासरी 1.5 कोटी असते. नव्या युनिटमध्ये सोलार पॅनेल्स असून याला 24 तास बाह्य वीजपुरवठ्याची गरज भासत नाही. 95 टक्के युनिट्स स्वदेशी उत्पादन असून, फक्त क्रिटिकल सेन्सर्स चीनमधून आयात केले जातात.
हेही वाचा – Eastern Free Way: मुंबई-ठाणे प्रवासाला नवी गती; MMRDA चा एलेव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्प सुरु
दरम्यान, महापालिकेचे उपायुक्त (पर्यावरण आणि हवामान बदल) अविनाश काटे यांनी सांगितले, मानसच्या लाँचिंगमुळे प्रथमच परिसर-स्तरीय रिअल-टाइम ट्रॅकिंग शक्य होईल आणि मुंबईकरांसाठी स्वच्छ हवा मिळवण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल. या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व IIT कानपूरचे प्रख्यात हवामान शास्त्रज्ञ प्रो. सच्चिदा नंद त्रिपाठी यांनी केले आहे. मानस नेटवर्कमुळे मुंबई हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी देशातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहरांपैकी एक ठरणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.