Anant Garje Wife Death: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. गौरी पालवे गर्जे ही केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. साधारण दहा महिन्यांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर सतत सुरू असलेल्या वैवाहिक वादामुळे गौरी मानसिक ताणाखाली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी गौरीने राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, तात्काळ गुन्हा नोंदवला न गेल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. अखेर रविवारी वरळी पोलिसांनी अनंत गर्जेवर गुन्हा दाखल केला.
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
या घटनेवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'प्रकरणासंदर्भातील प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिसांकडून संपूर्ण ब्रिफिंग मिळाल्यानंतरच पुढील भूमिका मांडता येईल.' तथापी, गौरीच्या मामांनी आरोप केला की, “ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या आहे. आमच्या मुलीला पद्धतशीरपणे त्रास दिला गेला.” त्यांनी प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. तसेच पोस्टमार्टम इन कॅमेरा करण्याची विनंतीही त्यांनी केली.
हेही वाचा – 'माझी लेक…' डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले अशोक पालवे?
मामा हृषिकेश गर्जे म्हणाले, “गौरी लढाऊ स्वभावाची होती. तिने कधीच हे टोकाचे पाऊल उचलले नसते. पण तिच्या पतीकडून सतत अत्याचार आणि मानसिक छळ होत होता. गौरीच्या आणखी एका मामाने सांगितले की, अनंत गर्जेने प्रथम मुलीच्या वडिलांना फोन करून काही न सांगता कॉल कट केला. नंतर आईला फोन करून गौरीने स्वत:ला संपवल्याची माहिती दिली. तथापी, गौरीच्या मामाने सांगितले की, “अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचे गौरीला कळले होते. तिने त्याला माफही केले होते. पण पुन्हा तो चॅटिंग करत असल्याचे दिसून आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाली. अनंत तिच्यावर मानसिक छळ करीत होता.”
दरम्यान, त्यांनी असेही आरोप केले की, “त्याने स्वतःच्या हातावर जखमा करून दाखवून गौरीवर दबाव टाकला होता." याशिवाय, कुटुंबीयांनी स्पष्ट केले की पंकजा मुंडेंचा या घटनेशी काहीही संबंध नाही. अनंत गर्जेने स्वतःचे वर्तन लपवून ठेवले होते आणि त्याच्या कृत्यांची माहिती पंकजा मुडें यांना नव्हती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.