Pune Election 2026: गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आपल्याच पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज (AB Form) चक्क गिळून टाकल्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले शिंदेसेनेचे कार्यकर्ते उद्धव कांबळे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून दिलेल्या आश्वासनानंतर कांबळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे प्रभाग 36 मधील शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमका पेच कसा सुटला?
उद्धव कांबळे हे प्रभाग 36 मधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र, पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला पसंती दिल्यामुळे संतापलेल्या कांबळे यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. हा वाद मिटवण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. "उद्धव, तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तुला पक्षात योग्य संधी दिली जाईल," असा शब्द शिंदेंनी फोनवरून दिल्यानंतर कांबळे यांनी नरमाईची भूमिका घेतली. मंत्री उदय सामंत यांनीही त्यांची भेट घेऊन समजूत काढली आहे.
नेमकं 'ते' थरारक नाट्य काय होतं?
दरम्यान, 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी घडलेला प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा होता. छाननीदरम्यान दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज पाहण्याच्या बहाण्याने उद्धव कांबळे यांनी तो निवडणूक अधिकाऱ्याच्या हातातून हिसकावून घेतला. अर्ज हातात येताच कांबळे थेट स्वच्छतागृहाच्या दिशेने पळाले आणि स्वतःला आत कोंडून घेतले. पोलिसांनी पाठलाग केला, पण कांबळे यांनी आतमध्ये अर्जाचे तुकडे करून ते चक्क गिळून टाकले. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी सुप्रिया करमरकर यांच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…
आता पुढे काय?
उद्धव कांबळे यांनी माघार घेतल्यामुळे शिंदेसेनेतील अंतर्गत संघर्ष तूर्तास शमला आहे. पुण्याच्या राजकारणात या 'अर्ज गिळंकृत' प्रकरणाची मोठी चर्चा रंगली असून, शिंदे आता कांबळे यांना पक्षात कोणती जबाबदारी देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.