ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या वादग्रस्त वक्त्यावामुळे चर्चेत असतात. तत्पूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी टीका केलेली. परंतु आता सदावर्ते यांनी हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. यामुळे कोट्यवधी शिवसैनिकांच्या व जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मनमाड शहर शाखेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक/पोलीस आयुक्त यांना आज, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता आणि कोट्यवधी जनतेचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल वापरलेले अपमानजन्य शब्द अत्यंत निंदनीय असून यामुळे शिवसैनिकांमध्ये, जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.
ॲड. सदावर्ते हे वारंवार प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी थोर महापुरुष व आदरणीय नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करतात. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात असून समाजात चुकीचा संदेश पसरत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कठोर कलमांन्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. जर मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.