Abhijeet Dipke: राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET) प्रकरणातील गैरव्यवहाराविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनावरून आता नवे राजकीय आणि सामाजिक युद्ध सुरू झाले आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण पिढीवर (Gen Z) टीका करताना, त्यांच्या आंदोलनामुळे देशाची जागतिक पातळीवर नाहक बदनामी झाल्याचा आरोप केला होता. रस्ते अडवून किंवा निदर्शने करून देश चालत नसून तो संविधान आणि संसदेच्या नियमांनी चालतो, असे सांगत त्यांनी तरुणांना ज्येष्ठांचा आणि संस्कृतीचा आदर करण्याचा सल्ला दिला होता.
रामदेव यांच्या या वक्तव्यावर 'कॉक्रोच जनता पार्टी'चे नेते अभिजीत दीपके यांनी अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. 'जय भीम'च्या घोषणा देणे किंवा राष्ट्रपुरुषांच्या विचारांवर चालणे ही बदनामी नसून, परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे देशाच्या प्रतिमेला खरा धक्का बसला आहे, असे दीपके यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी बाबा रामदेव यांना पतंजलीच्या उत्पादनांवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताशेऱ्यांची आठवण करून दिली. 'रामदेवांनी लोकशाही आणि संस्कृती वाचवण्याची काळजी करू नये, ती सांभाळण्यास आजची तरुण पिढी पूर्णपणे सक्षम आहे. त्यांनी स्वतःच्या कंपनीकडे आणि उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अन्यथा ती बंद पडण्याची वेळ येईल,' असा सणसणीत टोलाही दीपके यांनी लगावला.
आपल्या शेतकरी पार्श्वभूमीचा उल्लेख करत दीपके यांनी स्पष्ट केले की, देशातील बळीराजा आणि आंदोलक तरुण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच हे आंदोलन उभारण्यात आले होते आणि या लढ्याला शेतकरी संघटनांचा पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे तरुणांच्या हक्काच्या लढ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.