Pahalgaam Terror Attack: गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना संपवण्यापूर्वीचा थरार आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या 1,597 पानांच्या दोषारोपपत्रातून (चार्जशीट) समोर आला आहे. हल्ल्याच्या काही काळ आधी, या घटनेत सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांनी एका झाडाखाली बसून निवांतपणे जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या 2 स्थानिक साथीदारांना थोड्या अंतरावर थांबण्यास सांगितले. मजुरांच्या वेशात अंगावर घोंगड्या गुंडाळून आणि त्याखाली शस्त्रे लपवून या तिघांनी बैसारन येथील उद्यानात प्रवेश केला आणि संपूर्ण परिसर रक्ताने माखला. ही रक्तरंजित कत्तल घडवून आणल्यानंतर, पळून जात असताना त्यांनी विजयाचा जल्लोष म्हणून हवेतही गोळीबार केला होता.
'कलमा' न म्हणणाऱ्या बिगर-मुस्लिमांना संपवलं; देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा कट
NIA च्या दोषारोपपत्रानुसार, 22 एप्रिल रोजी बैसारनमध्ये पर्यटकांची कत्तल करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांच्या बळींना आधी धर्माबद्दल विचारले होते. अनेक प्रसंगी त्यांनी पर्यटकांना 'कलिमा' (इस्लामिक श्रद्धावचन) म्हणण्याची सक्ती केली. पळून जात असताना कुंपणाबाहेरील झाडांमागे लपलेल्या 3 पर्यटकांना दहशतवाद्यांनी पाहिले आणि त्यांनाही 'कलमा' म्हणण्याचा आदेश दिला. त्यातील एका व्यक्तीने 'कलमा' म्हटल्यामुळे दहशतवाद्यांनी त्याला जीवदान दिले, मात्र इतर 2 जणांना त्यांनी निर्घृणपणे संपवलं. यावरून त्यांचा एकमेव उद्देश केवळ बिगर-मुस्लिमांना संपवणे हाच होता, जेणेकरून संपूर्ण देशभरात जातीय तणाव आणि हिंसाचार भडकावता येईल, हे स्पष्ट झाले आहे.
हल्ल्यापूर्वी स्थानिक मेंढपाळाच्या झोपडीत मुक्काम; जिहादच्या नावाखाली घेतली मदत
या रक्तरंजित कटाचा उलगडा करताना NIA ने नमूद केले आहे की, हल्ल्याच्या 1 दिवस आधी या तिन्ही दहशतवाद्यांनी जवळच राहणाऱ्या परवेझ अहमद जोथड या स्थानिक गावकऱ्याच्या झोपडीमध्ये रात्र घालवली होती. 21 मे च्या संध्याकाळी परवेझचा नातेवाईक बशीर अहमद जोथड याने या 3 शस्त्रधारी दहशतवाद्यांना तिथे आणले होते. उर्दू आणि पंजाबी भाषेचे मिश्रण बोलणाऱ्या या दहशतवाद्यांनी सुरुवातीला पाणी मागितले आणि आपण 'जिहाद'साठी लढत असून 'मुजाहिदीन'ना मदत केल्यास ईश्वरी पुण्य मिळेल, असा युक्तिवाद केला. त्यानंतर परवेझच्या पत्नीने त्यांच्यासाठी चहा आणि जेवण बनवले, तर दहशतवाद्यांनी त्यांच्या पाठीवरच्या पिशव्या पलंगाखाली लपवून ठेवल्या. या प्रकरणी परवेझ आणि बशीर या दोन्ही स्थानिक साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
'गो-प्रो' कॅमेरा लावून रक्तपाताचा नंगानाच; दुपारी 2:23 वाजता सुटली पहिली गोळी
बैसरन खोऱ्यात अंतिम हल्ला चढवण्यापूर्वी दहशतवाद्यांनी आपले सामान झाडाखालीच सोडले. विशेष म्हणजे, हल्ला करताना त्यातील एका दहशतवाद्याने स्वतःच्या डोक्यावर 'गो-प्रो' (GoPro) हा ॲक्शन कॅमेरा लावला होता. उद्यानाच्या कुंपणाखालून सरपटत त्यांनी आत शिरकाव केला. त्यातील 2 दहशतवादी मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने गेले, तर तिसरा 'झिप-लाईन टर्मिनल'च्या बाजूने पुढे सरकला. दुपारी 2:23 वाजता एका दहशतवाद्याने M-4 कार्बाइनमधून पहिली गोळी झाडली. त्यानंतर काही सेकंदांतच उर्वरित दोघांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सजवळून आणि उताराच्या भागातून आपल्या AK-47 रायफल्समधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून एकाच वेळी सुनियोजितपणे केलेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण उद्यान मृतदेहांनी भरून गेले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.