अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे 3.30 वाजता अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. आग लागली त्यावेळी नवजात शिशु कक्षात तब्बल 39 लहान बाळं दाखल होती. यावेळी एसएनसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तीन लहान बालकांचा या आगीत होळपळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
यानंतर अमरावती घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेत आगीत होरपळून मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे. त्यासोबत जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगितले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत म्हटलं की, “अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.”
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2026
दरम्यान दुर्घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली का? यासह रुग्णालयातील विद्युत यंत्रणा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी केली जात आहे. नवजात शिशु कक्षात अशा प्रकारची घटना नेमकी कशी घडली? सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का? याचा तपास केला जाणार आहे.