पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमाशंकर दौऱ्यावर आलेले असताना परतीच्या प्रवासात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते, राज्यमंत्री दर्जा असलेल्या पुणे म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथील निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे राज्यात पक्षांतराच्या वातावरणात ही भेट वेगळचं वळण घेईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी लांडेवाडी येथे माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. शिंदे यांच्या गटात असतानाच त्यांना राज्यमंत्री दर्जाचं पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांनी शिंदे गटाची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर त्यांनी लोकसभा 2024 निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे-आढळराव भेटीमुळे आढळरावांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.