Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; ‘चारित्र्यहनन करणं बस्स करा, नाहीतर आम्हीही…’

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. दिशा सालियनला ओळखत नसल्याचे सांगत त्यांनी चारित्र्यहनन थांबवण्याचा इशारा दिला.

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; ‘चारित्र्यहनन करणं बस्स करा, नाहीतर आम्हीही…’

मुंबईतील दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण ओळखत नसल्याचं सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाच्या निमित्ताने आपलं आणि ठाकरे कुटुंबाचं नाव चर्चेत आणलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकाराला त्यांनी चारित्र्यहननाचा आरोप केला. अशा पद्धतीने आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा तपास यंत्रणांनी सत्य समोर आणावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दिशा सालियन यांच्या मृत्यूला आता सहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरात दिशा सालियन यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासात या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणाच्या तपासाबाबत वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे.

सीबीआयकडून आता या प्रकरणातील आधीचे पोलिस रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक आणि शवविच्छेदनाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. घटनास्थळाशी संबंधित उपलब्ध पुराव्यांचाही नव्याने आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तपासासाठी सीबीआयच्या स्पेशल क्राईम युनिटमधील एसपी सीमा पाहुजा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात काही राजकीय नेत्यांसह इतर व्यक्तींच्या नावांचा उल्लेख झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, तपास यंत्रणेकडून पुरावे समोर येईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, अशी कायदेशीर स्थिती आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं, याचा तपास आता सीबीआयच्या पुढील कारवाईतून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट किंवा ओळख झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं असून, आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याला त्यांनी विरोध केला आहे.

आता उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणावर राजकीय चर्चा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सीबीआयच्या तपासातून कोणते पुरावे समोर येतात आणि तपास कोणत्या दिशेने जातो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number